breaking-newsपुणेमहाराष्ट्र

प्रसाद घाणेकर यांचा अभिनव उपक्रम

साहित्य अभिवाचनातून ‘लाख’मोलाची मदत

पुणे : साहित्य अभिवाचनाचे प्रयोग करून प्रसाद घाणेकर यांनी डॉ. रा. चिं. ढेरे संस्कृती संशोधन केंद्राच्या कार्यासाठी ‘लाख’मोलाची मदत केली. पदरमोड करून साहित्य अभिवाचनाचे गेल्या आठ महिन्यांत ३० प्रयोग करून त्याद्वारे घाणेकर यांनी केंद्राच्या कामासाठी एक लाख दहा हजार रुपयांचा निधी संकलित केला.

लोकसाहित्य आणि लोकसंस्कृतीचे ज्येष्ठ संशोधक-साहित्यिक डॉ. रा. चिं. ढेरे यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून झालेल्या कार्यक्रमात या नावीन्यपूर्ण उपक्रमाबद्दल घाणेकर यांचा कृतज्ञतापूर्वक सत्कार करण्यात आला. मूळचे कणकवली येथील प्रसाद घाणेकर हे महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व पु. ल. देशपांडे आणि डॉ. रा. चिं. ढेरे यांच्या साहित्याचे चाहते आहेत. त्यांनी स्टेट बँक ऑफ इंडियातून स्वेच्छानिवृत्ती घेतली असून वाङ्मयीन उपक्रमांना मदत करण्यामध्ये त्यांना रूची आहे. कणकवली येथील ‘रंगवाचा’ या त्रमासिकामध्ये त्यांनी लेखन केले असून वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानचे ते सक्रिय कार्यकर्ते आहेत.

‘गुणं गाईन आवडी’ आणि दातृत्व या पुलंच्या दोन गुणांचा माझ्यावर प्रभाव आहे. डॉ. रा. चिं. ढेरे संस्कृती संशोधन केंद्राची माहिती मला होती. पुलंचे जन्मशताब्दी वर्ष सुरू होत असताना या केंद्राला कशा पद्धतीने मदत करता येईल हा विचार सुरू झाला. त्या वेळी ढेरे यांच्या साहित्य अभिवाचनाचे प्रयोग करण्याचे ठरविले आणि पुलंच्या जन्मशताब्दी प्रारंभाला म्हणजे ८ नोव्हेंबर रोजी पहिला प्रयोग केला, असे घाणेकर यांनी सांगितले. आतापर्यंत कोल्हापूर, सांगली, पुणे, मुंबई, सिंधूदुर्ग, कणकवली आणि अगदी पोर्ट ब्लेअर येथील विमानतळावरही अभिवाचनाचे प्रयोग केले आहेत. किमान पाचशे रुपयांचे अर्थसाह्य़ करण्याचे आवाहन मी श्रोत्यांना करतो. किमान या शब्दाचा अर्थ रसिकांनी चांगल्या पद्धतीने जाणल्यामुळे केवळ ३० प्रयोगांमध्येच लाखभराची रक्कम संकलित होऊ शकली. शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांनी दार उघडून दिले तर पुलंच्या जन्मशताब्दीची सांगता होईपर्यंत साहित्य अभिवाचनाचे  कार्यक्रम महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये करण्याचा मानस आहे, असे घाणेकर यांनी सांगितले.

घाणेकर यांच्यासारखी माणसे ही डॉ. रा. चिं. ढेरे संस्कृती संशोधन केंद्राची खरी संपत्ती आहे, अशी भावना केंद्राच्या सचिव वर्षां गजेंद्रगडकर यांनी व्यक्त केली. यापूर्वी त्यांनी विंदांच्या साहित्य अभिवाचनाचा कार्यक्रम केला होता. कार्यक्रम सादर करताना घाणेकर यांची कोणतीही अपेक्षा नसते. स्वखर्चाने जाऊन कार्यक्रम करताना संयोजकांना त्रास नको म्हणून ते स्वत:ची ध्वनियंत्रणा वापरतात, असेही त्यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button