breaking-newsपुणेमहाराष्ट्र

डी. एस. कुलकर्णी समूहाविरोधात पुरवणी दोषारोपपत्र

ठेवीदारांची फसवणूक प्रकरण

पुणे : ठेवीदारांची कोटय़वधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेकडून बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी समूहाविरोधात तिसरे पुरवणी दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. गुंतवणुकीच्या आमिषाने कुलकर्णी यांनी ठेवीदारांची २ हजार ९१ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे तपासात निष्पन्न झाले होते.

या प्रकरणाचा तपास करणारे आर्थिक गुन्हे शाखेतील सहायक पोलीस आयुक्त नीलेश मोरे यांनी नुकतेच विशेष न्यायालयात पुरवणी दोषारोपपत्र दाखल केले. विशेष सरकारी वकील अ‍ॅड. प्रवीण चव्हाण यावेळी उपस्थित होते. यापूर्वी कुलकर्णी आणि अन्य आरोपींविरोधात दोन दोषारोपपत्र दाखल करण्यात आली होती. तिसरे पुरवणी दोषारोपपत्र १२६ पानांचे असून लेखापरीक्षक सुनील घाटपांडे, अभियंता राजीव नेवासकर यांनी संगनमत करून ठेवीदारांचे पैसे अन्य खात्यात वळविले, असा ठपका पुरवणी दोषारोपपत्रात ठेवण्यात आला आहे.

या प्रकरणात घाटपांडे आणि नेवासकर यांना गेल्या वर्षी १९ जून रोजी अटक करण्यात आली होती. घाटपांडे, नेवासकर यांना ३० जुलै रोजी विशेष न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. पुरवणी दोषारोपपत्रात डीएसके उद्योगसमूहातील पाच कर्मचाऱ्यांची नावे आहेत. त्यांना लवकरच अटक करण्यात येणार असल्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेकडून देण्यात आली. दरम्यान, पुरवणी दोषारोपपत्रात नावे असलेल्या पाच कर्मचाऱ्यांपैकी तिघांनी न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळवण्याठी अर्ज  केला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button