breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पालिकेच्या नाकर्तेपणामुळे पवनेला जलपर्णीचा विळखा, शिवसेनेकडून प्रशासनाला आठ दिवसांची मुदत

  • शिवसेना जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे यांचा संताप
  • आयुक्तांच्या बंगल्यासमोर शिवसेना स्टाईल आंदोलन करणार

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

महापालिका प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे पवना नदीपात्रात जलपर्णी वाढून डासोत्पत्तीला खतपाणी मिळत आहे. नदीपात्रालगत राहणा-या नागरिकांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. येत्या आठ दिवसांत जलपर्णीवर मार्ग काढावा, अन्यथा प्रशासनाच्या विरोधात शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा शिवसेना जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे यांनी दिली आहे.

यासंदर्भात गजानन चिंचवडे यांनी पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, पवना नदीपात्रात वाढत चाललेल्या जलपर्णीकडे प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे. वाढत्या जलपर्णीमुळे पवना नदीपात्र डासोत्पत्तीचे केंद्र बनले आहे. नदी परिसरातील रावेत, पुनावळे, वाल्हेकरवाडी, ताथवडे, चिंचवड, थेरगाव, रहाटणी, काळेवाडी, पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव, सांगवी, दापोडी या भागांत त्याचा प्रादुर्भाव वाढला आहे. तेथील नागरिकांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. ही बाब अतिशय गंभीर असून नागरिकांच्या जीवावर बेतनारी आहे. याकडे पालिकेच्या आरोग्य विभागाचे जाणिवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याची बाब चिंचवडे यांनी निदर्शनास आणली आहे.

वास्तविक जलपर्णी ही दरवर्षी कोणत्या महिन्यात जास्त वाढते, त्याची कारणे शोधून जलपर्णीमुक्त नदीपात्र करण्यासाठी वार्षिक नियोजन करणे गरजेचे आहे. परंतू, प्रशासनाकडे विचारणा केली असता प्रशासनाचा प्रस्ताव, आयुक्तांची मान्यता, निविदाप्रक्रिया, स्थायीकडे विषयपत्र पाठविले आहे, मंजूरी बाकी अशी टोलवाटोलवीची उत्तरे दिली जातात. शहरात स्वच्छ भारत अभियान व राहण्यायोग्य शहर सर्वेक्षण सुरू आहे. यामुळेच नागरिकांनी सर्वेक्षणाकडे पाठ फिरवली असल्याचे धक्कादायक वास्तव चिंचवडे यांनी समोर आणले आहे. कारण मूलभूत नागरी सुविधांकडे महापालिकेचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे, असे चिंचवडे यांनी नमूद केले आहे.

महापालिका प्रशासनाला इशारा

प्रशासनाची दफ्तरदिरंगाई, ठिसाळ नियोजनामुळे शहराचा बकालपणा वाढत चालला आहे. येत्या आठ दिवसात जलपर्णी काढण्यास सुरुवात करावी. याबाबत कार्यवाही न झाल्यास आयुक्तांच्या निवासस्थानासमोर शिवसेना स्टाइलने आंदोलन केले जाईल, असा सज्जड इशारा गजानन चिंचवडे यांनी निवेदनाद्वारे आयुक्तांना दिला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button