breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणे

प्रवासी संख्येत वाढ: महिनाभरात पीएमपी पूर्ण क्षमतेने सुरू होणार!

पुणे | प्रतिनिधी

प्रवासी संख्येत वाढ होत असल्याने येत्या महिना-दीड महिन्यात पूर्ण क्षमतेने बस मार्गावर आणण्याचे नियोजन पुणे महानगर परिवहन महामंडळातर्फे (पीएमपी) करण्यात येत आहे. लॉकडाउननंतर सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात ‘पीएमपी’ची सेवा सुरू करण्यात आली. या सेवेचा लाभ तीन लाखांपेक्षा अधिक प्रवासी घेत आहेत. मागील काही दिवसांत प्रवासी संख्येत सातत्याने वाढ होत असून, प्रवासी संख्येचा आढावा घेऊन विविध मार्गांवरील बसची संख्या वाढविली जात आहे.

राज्य सरकारच्या ‘अनलॉक-४’च्या नियमांनुसार महापालिकेने शहरातील सार्वजनिक प्रवासी वाहतूक सेवा सुरू करण्यास परवानगी दिली. त्यानुसार तीन सप्टेंबरपासून ‘पीएमपी’ने १९० मार्गांवर ४२१ बसद्वारे सेवा देण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर प्रथमच दोन नोव्हेंबरला ‘पीएमपी’च्या दैनंदिन प्रवाशांची संख्या तीन लाखांवर गेली होती. त्यातून ४३ लाखांचे उत्पन्न मिळाले. मंगळवारी (१७ नोव्हेंबर) ‘पीएमपी’ला एका दिवसात तिकीट आणि पासच्या विक्रीतून ५० लाखांचे उत्पन्न प्राप्त झाले आहे.

दोन नोव्हेंबर रोजी एक हजार ९२ बस मार्गावर होत्या. त्याद्वारे शहरात १४ हजार ५१३ फेऱ्या झाल्या होत्या. त्यातून तीन लाख प्रवाशांनी प्रवास केला होता. दिवाळीच्या काळात मोठ्या संख्येने नागरिक बाहेरगावी गेल्याने ‘पीएमपी’ची प्रवासी संख्या घटली होती. त्यामुळे मार्गावरील बसची संख्या कमी करण्यात आली होती. मात्र, मंगळवारी अचानक प्रवासी संख्या मोठ्या प्रमाणात वाढली. या दिवशी मार्गावर ९२१ बस होत्या. शहरात १३ हजार २१० फेऱ्या झाल्या. दोन नोव्हेंबरच्या तुलनेत एक हजारांपेक्षा अधिक फेऱ्या घटल्या असल्या, तरी प्रवासी संख्या तीन लाख १५ हजार ८०० इतकी होती.

करोना संसर्गाची परिस्थिती आणि प्रवाशांची वाढती संख्या यांचा आढावा घेऊन बसची संख्या टप्प्याटप्याने वाढविण्यात येणार आहे. पूर्ण क्षमतेने बस मार्गावर येण्यासाठी किमान महिना ते दीड महिन्याचा कालावधी लागेल.
– राजेंद्र जगताप, अध्यक्ष, पीएमपी

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button