breaking-newsमहाराष्ट्रमुंबईराष्ट्रिय

प्रत्येक संरक्षण घोटाळ्यात गांधी कुटुंबाचे नाव कसे?

मुख्यमंत्र्यांचा सवाल

मुंबई : बोफोर्स तोफा, पाणबुडी खरेदी आणि आता ऑगस्टा वेस्टलॅंड हेलिकॉप्टर खरेदी अशा संरक्षण साहित्यविषयक प्रत्येक घोटाळ्यात कॉंग्रेस व तो पक्ष चालवणाऱ्या गांधी कुटुंबाचे नाव पुढे येते. ही गंभीर बाब असून, कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी त्याचे उत्तर द्यावे, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केली.

ऑगस्टा वेस्टलॅंड हेलिकॉप्टर प्रकरणातील आरोपी ख्रिस्तियन मिशेल याने या व्यवहारात सोनिया गांधींचे नाव घेतल्याचा दावा अंमलबजावणी संचालनालयाने न्यायालयात केल्याच्या पाश्र्वभूमीवर भाजपने सोमवारी देशभरात पत्रकार परिषद घेत कॉंग्रेसला लक्ष्य केले. मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘सह्य़ाद्री’ या शासकीय अतिथीगृहावर पत्रकार परिषद घेत कॉंग्रेस, सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्यावर टीकास्त्र सोडले. या प्रकरणात कॉंग्रेस व गांधी घराण्याविरोधात समोर आलेली कागदपत्रे ही २०१४ पूर्वीची आहेत. त्यामुळे भाजप सरकारचा त्या कागदपत्रांशी, त्यातील तपशीलांशी काहीच संबंध असण्याचे कारण नाही, असे फडणवीस यांनी सांगितले.

ऑगस्टा प्रकरणातील इटलीतील न्यायालयाचा निकाल आणि अधिकाऱ्यांवरील छाप्यांमध्ये सापडलेल्या कागदपत्रांतून या ३२०० कोटी रुपयांच्या व्यवहारात एकूण १० टक्के लाच देण्याचे ठरले. पैकी ५२ टक्के रक्कम कॉंग्रेस नेत्यांना, २८ टक्के सरकारी अधिकाऱ्यांना आणि २० टक्के हवाई दलाच्या अधिकाऱ्यांना देण्याचे सूत्र ठरल्याचे समोर आले आहे. ऑगस्टा वेस्टलॅंडचा व्यवहार सोनिया यांनीच मार्गी लावल्याचा उल्लेख मिशेलच्या एका पत्रात येतो, अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली.

या प्रकरणातील आरोपींच्या तोंडी-लेखी जबाबाच्या नोंदींमध्ये सोनिया गांधी, आर हे अद्याक्षर व त्याला जोडून, ‘पंतप्रधान होऊ शकेल असा इटालियन महिलेचा मुलगा’ असे उल्लेख कसे येतात, याचे उत्तर पक्षनेतृत्वाने दिले, असा सवालही फडणवीस यांनी केला.

राफेलबाबत सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला आहे. मात्र, सर्वोच्च न्यायालयाचा निकाल मानणार नाही, अशी भूमिका घेणाऱ्यांना नेता म्हणवून घेण्याचा अधिकार नाही, असा टोलाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी राहुल गांधी व उद्धव ठाकरे या दोघांना टोला लगावला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button