प्रजासत्ताक दिनी नऊ जणांकडून एकाला बेदम मारहाण, गुन्हा दाखल
पिंपरी, (महा-ई-न्यूज) – प्रजासत्ताक दिनी झेंडा वंदन झाल्यानंतर नऊजणांनी जुन्या भांडणाचा वाद काढून एकाला बेदम मारहाण केली. सिमेंटचा गट्टू डोक्यात घालून तरुणाला गंभीर जखमी केले. याप्रकरणी नऊजणांवर पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. हा प्रकार शनिवारी (दि. 26) दुपारी दोनच्या सुमारास पिंपरीतील भवानी चौकात घडला आहे.
वैभव हटांगळे (वय 21, रा. घरकुल, चिखली) आणि अन्य आठ अशा नऊ जणांवर पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी निकुल उर्फ कुनाल सुनिल वेताळ (वय 19, रा. गांधीनगर, पीजे चेंबरमागे, पिंपरी) यांनी तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निकूल शनिवारी प्रजासत्ताक दिनादिवशी झेंडावंदन झाल्यानंतर पिंपरीतील भवानी चौकात मित्रासोबत बोलत उभा होता. तेवढ्यात वैभवने ‘तु भाई झालास का, थांब तुझी वाट लावतो’, असे म्हणून जुन्या भांडणाचा वाद काढला. वैभवच्या साथिदाराने निकूलला खाली पाडून त्याच्या पाठीत सिमेंटचा गट्टू घातला. चक्कार आल्याने तो खाली कोसळला. तेव्हा सर्वांनी मिळून त्याला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.