breaking-newsमहाराष्ट्र

तुळजाभवानीच्या चरणस्पर्शाने पुजाऱ्यांमध्ये शीतयुद्ध

महाराष्ट्राची  कुलस्वामिनी असलेल्या तुळजाभवानी मंदिरात शनिवारी रात्री भोपे पुजाऱ्यांच्या महिला सेवेकरांव्यतिरिक्त अन्य महिलांनी गाभाऱ्यात प्रवेश करत देवीच्या मूळ मूर्तीला चरणस्पर्श करून दर्शन घेतले. दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधींनाही गर्भगृहात जाऊन तुळजाभवानीचे दर्शन घेता आले नव्हते. मात्र शनिवारी वर्षांनुवर्षे चालत आलेली प्रथा माजी नगराध्यक्ष मंजूषा मगर व अन्य महिलांनी मोडीत काढण्याचा प्रयत्न केला. यावरून भोपे पुजारी व पाळीकर पुजाऱ्यांमधील शीतयुध्द चव्हाटय़ावर आले असून इतर महिलांनाही चरणस्पर्शाचा अधिकार मिळायला हवा, यासाठी हवे ते प्रयत्न केले जात आहेत. त्याचाच एक भाग असलेल्या या घटनेला शबरीमाला प्रकरणाशी सुसंगत  केले जात असल्याची चर्चा जिल्हाभरात सुरू आहे.

तुळजाभवानी देवीच्या मूर्तीला स्पर्श फक्त पुजारी करतात. पूर्वीपासून भोपे पुजाऱ्यांच्या महिलांना तुळजाभवानी मातेच्या मंदिरातील गाभाऱ्यात जाण्यास, चरणस्पर्श आणि अभिषेक पूजा करायला परवानगी होती. मात्र तसा लिखित नियम मंदिर संस्थानकडे अद्यापि सापडलेला नाही. या संदर्भात पूजा बालाजी गंगणे व इतर महिला ५ नोव्हेंबर  २०१८ रोजी मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकाऱ्यांना जाऊन भेटल्या. त्यांनी आम्ही महिला भाविक असून चरणतीर्थ, प्रक्षाळ पूजा तसेच इतर सर्व पूजेच्यावेळी भोपे पुजारी केवळ त्यांच्याच परिवारातील महिलांना देवीच्या मुख्य चबुतऱ्यावर उभे करून चरणस्पर्श करून पूजा आणि दर्शन करण्याची मुभा देतात. या प्रकाराला आजवर मंदिर संस्थानने हरकत घेतली नाही. मात्र तसे करण्याचा अधिकार महिलांना नाही. भोपेंच्या महिला हवा तितका वेळ काढून मनमानी पध्दतीने पूजा आणि दर्शन घेतात. भारतीय संविधानाचे कलम १४ ते १८ नुसार समानता हा आमचा अधिकार आहे, ज्याचे रक्षण करणे प्रशासनाची जबाबदारी आहे.

सहायक धर्मादाय आयुक्तांनी मे २०१८ मध्ये दिलेल्या एका न्यायनिर्णयाआधारे अन्य महिलांनाही देवी मंदिरात जाऊन चरणस्पर्श करून पूजा व दर्शनाचा अधिकार असल्याचे निवेदनात नमुद केले होते. त्यानंतर मंदिर संस्थानच्या नियम आणि न्यायनिर्णयाची अंमलबजावणी याचा प्रश्न निर्माण झाला होता.

काही महिलांनी मंदिर संस्थांच्या कुठल्या नोंदणीत किंवा नियमात हे आहे का, याची विचारणा केली. त्यासंदर्भात नियम नाहीत हे लक्षात आल्यानंतर शनिवारी रात्री या महिलांनी देवीचा चरणस्पर्श केला. तुळजाभवानी देवीच्या मूर्तीला चरणस्पर्श करण्याचा अधिकार अनेक वर्षांपासून तुळजापुरातील सोळा घरे म्हणजेच भोपे पुजारी आणि त्यांच्या घरातील महिलांना होता. इतर महिलांनाही चरण स्पर्श करण्याची इच्छा होती. मात्र या घटनेने पुजारी मंडळांमधील व्यक्त न होणारे वादमुद्दे चव्हाटय़ावर आले आहेत. दिवसभर याबाबत जिल्हाभरात वेगळीच चर्चा होती. अनेकांनी या घटनेला शबरीमाला घटनेशी सुसंगत प्रकार असल्याची चर्चा घडवून आणण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येत होते.

सर्वच महिलांना अधिकार हवा

भारतीय राज्यघटनेनुसार  कु ठलाही भेदभाव न करता सर्वाना समान अधिकार आहेत. यानुसार भोपे पुजारी परिवारातील महिलांप्रमाणेच इतर महिला भाविकांनाही तुळजाभवानी देवीचे चरणस्पर्श करून दर्शन घेण्याचा अधिकार असला पाहिजे. मंदिर प्रशासनाचा तसा कु ठलाही नियम नाही. त्यामुळे सर्वच महिलांना मंदिरात जाऊन चरणस्पर्श, दर्शन व पूजेचे अधिकार असावेत.    – अ‍ॅड. मंजूषा मगर

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button