breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणे

पुण्यात पाच किलोमीटरचा प्रवास आता फक्त ५ रुपयांत

पुणे |महाईन्यूज|

‘पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या ‘अटल’ बस सेवेला आज सुरुवात झाली. या अंतर्गत पुणेकरांना पाच किलोमीटरपर्यंतचा प्रवास अवघ्या ५ रुपयांत करता येणार आहे. दर पाच मिनिटाला ही सेवा उपलब्ध असेल.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष व कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते आज या सेवेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ, पिंपरी चिंचवडच्या महापौर माई ढोरे, सभागृह नेते धीरज घाटे, आयुक्त विक्रमकुमार, पीएमपीचे अध्यक्ष राजेंद्र जगताप, संचालक शंकर पवार यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. ‘रस्त्यावरच ट्रॅफिक कमी करायचं असेल तर चांगली सार्वजनिक वाहतूक सुविधा देणं आवश्यक आहे. वेळ आणि पैसे वाचत असतील तर लोक नक्की या सुविधेचा वापर करतील, असे मत भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले. तसेच, राज्यातील अन्य महापालिका या योजनेचे अनुकरण करतील, असेही ते म्हणाले.

कल्याणकारी राज्यात कोणतीही सार्वजनिक वाहतूक व्यवस्था फायद्यात चालत नाही. शहरात वाढती दुचाकी, चारचाकी संख्या कमी करण्यासाठी पीएमपीने स्वस्त व सुलभ सेवा द्यावी. वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी सार्वजनिक वाहतूक सक्षम असणे गरजेचे आहे. पीएमपीच्या या उपक्रमाचा नागरिकांना चांगला फायदा होणार आहे, असे पाटील म्हणाले. दर पाच मिनिटाला पाच रुपयात पुणेकरांना पाच किलोमीटरचा प्रवास करता येणार. दरम्यान या कार्यक्रमानंतर महापालिका भवनातून अटल सेवेचा बस मार्गस्थ करण्यात आल्या. पीएमपी अध्यक्ष राजेंद्र जगताप यांनी यावेळी अटल योजनेच्या बसने प्रवास केला.

‘अटल’ योजनेअंतर्गत पुणे स्टेशन, स्वारगेट, शिवाजीनगर, डेक्कन जिमखाना, महापालिका भवन आणि पूलगेट अशा शहराच्या महत्त्वाच्या स्थानकांवरून सरासरी तीन ते सहा किलोमीटरच्या अंतरातील नऊ मार्गांवर दर पाच मिनिटांनी बस धावणार आहे. कोणत्याही अंतरासाठी पाच रुपये तिकीट आकारले जाणार आहे. या सेवेसाठी १०१ मिडी बसचा वापर केला जाणार असून सर्व मध्यवर्ती पेठांत ये-जा करता येणार आहे. प्रवाशांना शहराच्या एका भागातून दुसऱ्या भागात जाण्यासाठी ही फीडर सेवा ठरणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button