breaking-newsपुणेमहाराष्ट्र

पुण्यात तासभर कोसळ”धार’

  • पुणेकर चिंब : मान्सूनचा पहिलाच पाऊस

सायंकाळी उशिरापर्यंत रिपरिप; वातावरणात गारवा

पुणे – डोळ्यांत पाणी आणून चातकाप्रमाणे पावसाची वाट पाहणाऱ्या पुणेकरांना गुरूवारी दुपारच्या सुमारास मुसळधार पावसाने चांगलाच दिलासा दिला. सुमारे तासभर कोसळणाऱ्या या पावसाने गेल्या आठवड्यांत वाढलेली उष्णता गायब झाली असून वातावरण चैतन्यदायी झाले आहे. दरम्यान, येत्या 24 तासांत पुणे आणि परिसरात पुन्हा मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

मान्सून दाखल झाल्याची घोषणा हवामान विभागाने दि. 8 जून रोजीच केली होती. पण, मुंबई, कोंकण, गोव्यासह मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागातच पाऊस दाखल झाला. तर मध्य महाराष्ट्रासह पुणे आणि पश्‍चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांत अजून मोठा पाऊस झाला नव्हता. विशेष म्हणजे, शेजारच्या पिंपरी-चिंचवड परिसरात थांबून-थांबून पाऊस असताना पुणे शहर मात्र तुलनेने कोरडेच होते. त्यातच उन्हाळ्यासारखा उकाडा होत असल्याने चिंतेत भर पडली. पण, गुरूवारी सकाळपासून कडक ऊन पडले असताना दुपारी 2.45च्या सुमारास आभाळ अचानक भरून आले आणि अवघ्या काही मिनिटांतच मुसळधार पावसाला सुरूवात झाली. विशेष म्हणजे फक्‍त उपनगरांतच नाही, तर मध्यवस्तीतदेखील मुसळधार पावसाने हजेरी लावत दिलासा दिला. त्यामुळे गुंडाळून ठेवलेल्या छत्र्या आणि रेनकोट बाहेर निघाले.

मध्यवस्तीत सर्व पेठा, सिंहगड रस्ता, वडगाच-धायरी, नऱ्हे, खडकवासला, वारजे, कोथरूड, बावधन, धानोरी, वडगांव शेरी, येरवडा, विश्रांतवाडी, नगर रस्ता, खराडी, मुंढवा, हडपसरसह कोंढवा, कात्रज भागात मुसळधार पाऊस झाला. दरम्यान, या पावसाने सखल भागात पाणी साचले, तर नाल्यांमधील पाणी रस्त्यावर आले. त्यामुळे पहिल्याच पावसाच्या तडाख्यात महापालिकेने केलेल्या नालेसफाईचे पितळ उघडे पडले. तर घोरपडी भागातील सदर्न कमांड परिसरातील रस्त्याला अक्षरश: नदीचे स्वरूप आले होते. त्यामुळे वाहनचालकांना त्रास सहन करावा लागला. या सर्व परिस्थितीमुळे वाहतुकीचा वेग मंदावल्याचेही दिसून आले.

राज्यभरात ठिकठिकाणी नोंद
गेल्या 24 तासांत राज्यात ठिकठिकाणी पावसाची नोंद झाली. पण, हा पाऊस पेरणीयोग्य नसल्याचे सांगण्यात येत आहे. तर, कोंकणात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत मुसळधार पाऊस झाला. मराठवाड्यातही लातूर, परभणीसह बीड जिल्ह्यांतदेखील तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली. विदर्भात अकोला, अमरावती, यवतमाळ, नागपूर, भंडारा-गोंदियासह काही ठिकाणी पाऊस झाला. तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणीच पावसाची नोंद झाली.

  • येत्या 24 तासांत पावसाची शक्‍यता
    पुणे वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार, येत्या 24 तासांत कोकण-गोव्यात बहुतांश ठिकाणी, तर मध्य-महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात बऱ्याच ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्‍यता आहे. तर, पुणे आणि परिसरात आकाश सामान्यत: ढगाळ राहून मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचीदेखील शक्‍यता आहे.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button