breaking-newsताज्या घडामोडीपुणे

पुण्यात ‘इन्स्टाग्राम’वरून १८ लाखांना गंडा

पुणे |महाईन्यूज|

‘इन्स्टाग्राम’वर अनोळखी व्यक्तीशी मैत्री आयटी कंपनीतील तरुणीला चांगलीच महागात पडली आहे. सायबर चोरट्याने तरुणीला आपण लंडनमध्ये कार्यरत असल्याचे सांगून महागड्या गिफ्टच्या बहाण्याने १७ लाख ७४ हजारांचा ऑनलाइन गंडा घातल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बाबत तीस वर्षीय तरुणीने तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञात व्यक्तीवर आयटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुणीची जुलै २०१९मध्ये ‘इन्स्टाग्राम’वर एका तरुणाशी ओळख झाली. त्या तरुणाने आपण लंडनमध्ये नोकरी करीत असल्याचे सांगून ओळख वाढविली. त्यानंतर त्यांच्यात संभाषण सुरू झाले. तरुणाने तिला लंडन येथून महागडे गिफ्ट, सोने, हँडबॅग आणि विदेशी चलन पाठविल्याचे सांगितले. गिफ्ट पाठविल्याचे सांगितल्यानंतर एके दिवशी तरुणीला दिल्ली कस्टम विभागातून बोलत असल्याची बतावणी करणारा फोन आला. तुमचे गिफ्ट आले असून ते सोडवून घेण्यासाठी करापोटी काही रक्कम भरावी लागे, असे सांगण्यात आले. त्यासाठी तरुणीला रक्कम ऑनलाइन भरण्यास सांगितली.

महागडे गिफ्ट आणि विदेशी चलन मिळविण्याच्या आमिषाने तरुणीने वेळोवेळी ऑनलाइन पद्धतीने १७ लाख ७४ हजार रुपये तरुण सांगेल, त्या बँक खात्यात जमा केले. तरुणाकडून वारंवार रकमेची मागणी होत असल्यामुळे तरुणीला शंका आली. त्यामुळे तिने रक्कम पाठविण्याचे बंद केले. तिने त्याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, तो झाला नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तरुणीने सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर तो गुन्हा विमानतळ पोलिस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिस निरीक्षक बळवंत मांडगे तपास करत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button