breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

पुण्याचा कचरा डेपो नव्‍हे; मोशीत साकारणार आंतरराष्ट्रीय दर्जाचा ‘सफारी पार्क’

  • पुणे महापालिकेच्या मागणीला आमदार महेश लांडगे यांचा तीव्र विरोध
  • राज्याचे पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांच्याकडे केली आग्रही मागणी

पिंपरी । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी ।

पिंपरी-चिंचवडच्या लौकिकात भर घालणारा आंतरराष्ट्रीय दर्जाचा ‘सफारी पार्क’ मोशी येथे साकारण्यात येणार आहे. या परिसरातील जागेची मागणी पुणे महापालिका कचरा डेपोसाठी करीत आहे. त्याला आमचा तीव्र विरोध आहे. त्यामुळे राज्याच्या पर्यटन विकास विभागाच्या पुढाकाराने ‘सफारी पार्क’ सारखा महत्त्वाकांक्षी प्रकल्प मार्गी लावण्यात यावा, अशी आग्रही मागणी भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी केली आहे.

विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन मुंबईत सुरू आहे. त्यादरम्यान पर्यटन विकास मंत्री जयकुमार रावल यांची भेट आमदार महेश लांडगे यांनी घेतली. त्यावेळी ‘सफारी पार्क’ प्रकल्पाबाबत निवेदन देण्यात आले.

विशेष म्हणजे, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही ‘सफारी पार्क’ प्रकल्पाबाबत सकारात्मक भूमिका घेतली आहे. संबंधित विभागाचे मंत्री आणि महापालिका व पर्यटन विकास विभागाचे अधिकारी यांची बैठक आठवडाभरात होणार आहे. त्यामध्ये या प्रकल्पाला चालना देण्याबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाणार आहे.

‘औद्योगिकनगरी’ असलेल्या पिंपरी-चिंचवडमध्ये परदेशातील ‘सफारी पार्क’च्या धर्तीवर  भारतातील पहिला प्रकल्प मोशी परिसरात नियोजित आहे. त्यासाठी लागणारा कोट्यवधी रुपयांचा खर्च महापालिका प्रशासनाने करण्यापेक्षा महापालिका आणि राज्य शासनाचा पर्यटन विकास विभागाने एकत्रितपणे हाती घ्यावा, अशी मागणी आमदार लांडगे यांनी केली आहे. त्यादृष्टीने पाठपुरावा सुरू करण्यात आला आहे.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडील मंजूर विकास आराखड्यातील मौजे मोशी येथील गट नं. ६४६ या सरकारी गायरान जमिनीवर सुमारे ३३.७२ हेक्टर क्षेत्र आ. क्र ०१/ २०७ सफारी पार्क म्हणून आरक्षित करण्यात आले आहे.

 ****

…तर पर्यटन क्षेत्रात पीसीएमसी जागतिक नकाशावर!

भोसरी विधानसभा मतदार संघातील चिखली, मोशी, च-होली आदी परिसरात महापालिका, राज्य सरकारच्या पुढाकाराने एज्युकेशन हब, इंडस्ट्रिअल हब, संतपीठाच्या माध्यमातून निर्माण होणारे सांप्रदायिक व्यासपीठ विकसित होत आहे. आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्र, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यायलही याच भागात निर्माण होणार आहे. तसेच, इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पही हाती घेतला आहे. त्यामुळे भविष्यात हा परिसर शहरातील ‘हॉट डेस्टिनेशन’ होणार आहे. त्यामुळे या भागातील ‘सफारी पार्क’साठीची आरक्षित जागा पुणे महापालिका प्रशासन कचरा डेपोसाठी मागणी करीत आहे. मात्र, या ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाचे ‘सफारी पार्क’ विकसित झाल्यास पर्यटन क्षेत्रात पिंपरी-चिंचवडची नोंद जागतिक नकाशावर होईल. त्यामुळे आगामी काळात शहराचे ‘सेंटर ऑफ ॲट्रॅक्शन’ चिखली, मोशी आणि च-होली राहील, असे तज्ज्ञांचे मत आहे.

****

समाविष्ट गावांना पर्यटन संजिवनी…

पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील समाविष्ट गावे अर्थात मोशी, चिखली, च-होलीचा अत्यंत वेगाने विकास होत आहे. महत्त्वाकांक्षी प्रकल्प याठिकाणी हाती घेतले आहेत. महापालिकेत समाविष्ट झाल्यापासून या गावांच्या पायाभूत सोयी-सुविधांकडे दुर्लक्ष झाले होते. मात्र, आमदार लांडगे यांनी समाविष्ट गावांच्या विकासासाठी पुढाकार घेतला. चिखली, मोशी, च-होली आदी भागांतील विविध महत्त्वाकांक्षी नियोजित प्रकल्प पूर्ण झाल्यास या भागातील उद्योग-व्यावसायाची वृद्धी होणार आहे. तसेच, स्थानिक नागरिकांना रोजगार उपलब्ध होतील. यासह बांधकाम व्यावसायिकांना त्याचा फायदा होणार आहे. त्यामुळे विविध प्रकल्पांच्या माध्यमातून समाविष्ट गावांना संजिवनी देण्याचे ‘व्‍हीजन’ आमदार महेश लांडगे यांनी ठेवले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button