breaking-newsपुणेमहाराष्ट्र

पुणे: 49 कोटी रुपयांच्या सभागृहाला गळती

उपराष्ट्रपतींसमोरच विस्तारीत इमारतीची “शोभा’

पुणे –“देशातील जवळपास सर्वच प्रमुख शहरांमध्ये फिरलो, मात्र पुणे महापालिकेने बांधल्यासारखे अद्वितीय आणि अप्रतिम सभागृह मी कुठेच पाहिले नाही,’ असा स्तुतिसुमनांचा वर्षाव देशाचे उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू महापालिकेच्या विस्तारीत इमारतीमधील सभागृहाच्या लोकार्पण सोहळ्यात केला. पण, त्याच वेळी तब्बल 49 कोटी रुपये खर्चून उभारलेल्या या सभागृहाला चक्‍क गळती लागल्याचा धक्कादायक समोर आला आहे.

बाह्य भिंतीचा रंगही उडाला
या नवीन इमारतीला लोकार्पण कार्यक्रम असल्याने बाहेरील बाजूने रंगही दिलेला होता. मात्र, पहिल्याच पावसाने या भिंतीचा रंगही उडाला. धक्कादायक बाब म्हणजे, या इमारतीमध्ये पडणारे पावसाचे पाणी वाहून नेण्यासाठी तयार केलेल्या ड्रेनेज लाइनही तुंबल्याने तळमजल्याच्या पोर्चमध्ये अर्धाफूट पाणी साचले. तर अनेक दरवाजांमधून पाऊस आत आल्याने इमारतीमध्ये पावसाळ्यात अनेक ठिकाणी पाणी घुसणार असल्याचे चित्र आहे.

महापालिकेने बांधलेल्या विस्तारित इमारतीच्या गळतीचे प्रमाण एवढे मोठे होते, की सभागृहात बसलेल्या काही नगरसेवकांना आपली जागा सोडावी लागली. मात्र, यामुळे घाईघाईने केलेल्या इमारतीच्या कामाच्या दर्जाबाबतच शंका उपस्थित होत आहेत. शिवाय या कार्यक्रमाला गालबोट लागले असून सर्व स्तरातून टीका केली जात आहे.

महापालिका प्रशासनाने विस्तारीत इमारत उभारली. काम पूर्ण होण्याआधीच भाजप घाई-गडबडीने उद्‌घाटन करत असल्याचा आरोप विरोधकांनी केला. गुरूवारी या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर उभारलेल्या सभागृह लोकार्पणाचा कार्यक्रम होता. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह पुणे जिल्ह्यातील आमदार आणि भाजपचे पुणे प्रतिनिधी उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांचे भाषण सुरू असतानाच, सभागृहात डाव्या बाजूला दोन ठिकाणी पाणी गळती सुरू झाली. त्यावेळी अधिकाऱ्यांनी धाव घेत ही गळती थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना काही समजण्याच्या आतच पाण्याची धार लागली. अवघ्या काही क्षणातच सभागृहातील एका टेबलवर तळे साचले. तर, ज्या ठिकाणी “पीओपी’ करण्यात आले, तेथे पाण्यामुळे मोठा फुगवटाही निर्माण झाला. मात्र, हा सर्व प्रकार सुरू असताना, काहीच झाले नसल्याचे भासवत हा कार्यक्रम उरकण्यात आला. मात्र, या प्रकारामुळे सभागृहात साऊंड सिस्टीम पुरविणाऱ्या ठेकेदाराच्या काही उपकरणांचेही नुकसान झाल्याचे समोर आले.

टेरेसवरून पाणी वाहून नेणाऱ्या पाइपमध्ये कचरा अडकला होता. त्यातच मोठा पाऊस झाल्याने टेरेसवर पाणी साचले. परिणामी, एका ठिकाणी हे पाणी सभागृहात आले. पाण्याला मार्ग करून दिल्यानंतर ही गळती थांबली. मात्र, याप्रकरणी नेमके काय झाले, याची माहिती घेऊन वेळ पडल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल.
– मुक्ता टिळक, महापौर, पुणे

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button