breaking-newsताज्या घडामोडीपुणे

पुणे विमानतळावरुन आक्षेपार्ह वस्तू घेऊन जाणे, आता सुरक्षा रक्षकांच्या नजरेतून सुटणार नाही

पुणे|महाईन्यूज|प्रतिनिधी|

पुणे विमानतळावर कोणतीही आक्षेपार्ह वस्तू घेऊन जाणे आता सुरक्षा रक्षकांच्या नजरेतून सुटणार नाही. प्रवाशांच्या सामानाची तपासणी करण्यासाठी कृत्रिम बुध्दिमत्तेचा (आर्टिफिशिल इंटिलिजन्स) आधार घेत नवीन सॉफ्टवेअर विकसित करण्यात आले असून त्याद्वारे अत्यंत सुक्ष्म वस्तुही सहजरीत्या दिसणार आहे. त्याची चाचणी सुरु करण्यात आली आहे.

पुणे विमानतळ हे हवाई दलाचे असल्याने अत्यंत संवेदनशील आहे. त्यामुळे या विमानतळाच्या सुरक्षेच्यादृष्टीने सातत्याने विविध पावले उचलली जातात. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाकडून विमानतळाच्या सुरक्षेची जबाबदारी सांभाळली जाते. काही महिन्यांपुर्वीच विमानतळावर अत्याधुनिक बॉडी स्कॅनर बसविण्यात आला आहे. या माध्यमातून प्रवाशांची वेगाने तपासणी करणे शक्य होत आहे.

विमानतळ प्रशासनाने सामानाची तपासणी अधिक काटेकोरपणे करण्यासाठी या यंत्रणेमध्ये नवीन सॉफ्टवेअर बसविले आहे. याद्वारे सामानातील सुक्ष्म वस्तुही लगेच निदर्शनास पडणार आहे. एखादी पाण्याची बाटली असल्यास त्यामध्ये किती पाणी आहे, जेवणाच्या डब्यामध्ये खाद्यपदार्थांव्यतिरिक्त अन्य काही आहे किंवा नाही, बॅगेतील कपड्यांमध्ये काही लपविले आहे किंवा नाही अशा सर्व बारीक गोष्टी लक्षात येणार आहेत. त्यामुळे कोणतीही वस्तु लपुन राहणार नाही. या यंत्रणेमध्ये कोणतीही आक्षेपार्ह गोष्ट आढळून आल्यास लगेचच सुरक्षायंत्रणेला अलर्ट जाईल.

‘आयआयटी’ संस्थेतील माजी विद्यार्थ्यांच्या स्टार्ट अप कंपनीने हे सॉप्टवेअर विकसित केले असून पहिल्यांदाच पुणे विमानतळावर त्याची चाचणी घेतली जात आहे. ही चाचणी यशस्वी झाल्यानंतर इतर विमानतळांवरही त्याचा वापर होऊ शकतो. विमानतळ प्राधिकरणाच्या ‘इनोव्हेट फॉर एअरपोर्टस’ या उपक्रमांतर्गत स्टार्ट अप कंपन्यांकडून नावीण्युपुर्ण संकल्पना मागविण्यात आल्या होत्या. सुमारे ३५० स्टॉर्ट अपपैकी केवळ ८ ची निवड करून त्यांच्या संकल्पनांची चाचणी विविध विमानतळांवर सुरू करण्यात आली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button