हेमांगी कवी पोळ्या लाटत होती, ट्रोलर्सची नजर नको तिथे होती
मुंबई: प्रसिद्ध अभिनेत्री हेमांगी कवी-धुमाळ सध्या तिच्या ‘बाई, बुब्स आणि ब्रा’ या फेसबुक पोस्टमुळे चर्चेत आली आहे. या पोस्टवरुन सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी “किती दिवस आपण बाईच्या दिसण्यावर चर्चा करणार आहोत, तिच्या असण्यावर काही चर्चा करणार आहोत की नाही?” असा सवाल यानिमित्त उपस्थित केला आहे. हेमांगीने शेअर केलेल्या पोळ्या लाटण्याच्या व्हिडीओमध्ये ट्रोलर्सची नजर नको तिथे होती, त्यावर इतक्या घाणेरड्या कमेंट्स आल्या, याकडे चित्रा वाघ यांनी लक्ष वेधलं.
“ट्रोल करणाऱ्या मंडळींना हेमांगी कवीचे अभिनय कौशल्य किंवा वेगवेगळ्या व्हिडिओमधून ती सामाजिक प्रश्न मांडते, ते दिसत नाही का? आजही आपण बाईच्या दिसण्यावर चर्चा करणार आहोत का? तिच्या असण्यावर काही चर्चा करणार आहोत की नाही? तिच्या कर्तृत्वावर काही चर्चा करणार आहोत की नाही? अजून किती दिवस बायकांना तुम्ही बंधनात ठेवणार आहात?” अशा प्रश्नांची सरबत्ती चित्रा वाघ यांनी केली.