breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणे

पुणे पदवीधर मतदार संघ निवडणूक : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला बंडखोरीचा फटका?

पुणे । प्रतिनिधी

राज्यातील विधान परिषदेच्या ५ जागांसाठी येत्या १ डिसेंबरला निवडणूक होत आहे. यातच यंदा महाविकास आघाडी आणि भाजप यांच्यात थेट लढत होणार आहे. पुणे पदवीधर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसने सांगलीचे अरुण लाड यांना उमेदवारी दिली आहे. तशी घोषणा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली होती. मात्र, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांचे निकटवर्तीय कोल्हापूरमधून राष्ट्रवादीचे भैया माने यांनीही बुधवारी (दि ११) उमेदवारी अर्ज भरला आहे. त्यामुळे गेल्यावेळी बंडखोरीचा फटका राष्ट्रवादीला बसला त्याचीच पुनरावृत्ती होणार असे चित्र निर्माण झाले आहे.

विधान परिषद निवडणूक यंदा चांगलीच चर्चेत आली आहे, कारणही तसेच आहे. पहिल्यांदाच महाविकास आघाडी ही निवडणूक लढणार आहे. त्यामुळे सुरुवातीपासूनच इच्छुकांची मनधरणी करण्यापासून ते बंडखोरी कोणी करू नये यासाठी प्रयत्न सुरू होते. ५ जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत नागपूर पदवीधर आणि पुणे शिक्षक मतदारसंघ ही निवडणूक काँग्रेस लढणार आहे, तर औरंगाबाद आणि पुणे पदवीधर निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस लढणार आहे.

उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत राष्ट्रवादी पुणे पदवीधर मतदारसंघात कोणाला उमेदवारी देणार, याबाबत उत्सुकता होती, अखेर शेवटच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसने अरुण लाड यांना पुणे पदवीधर मतदारसंघातून अधिकृत उमेदवारी दिली. तत्पूर्वी पुणे पदवीधर मतदारसंघातून कोल्हापूरमधून राष्ट्रवादीचे भैया माने यांनी ११ तारखेला उमेदवारी अर्ज भरला. त्यामुळे राष्ट्रवादीत बंडखोरीच्या पुनरावृत्तीचे चित्र पुन्हा निर्माण झाले आहे.

गेल्यावेळी पुणे पदवीधर मतदारसंघातून राष्ट्रवादीकडून खासदार श्रीनिवास पाटील यांचे चिरंजीव सारंग पाटील यांना उमेदवारी देण्यात आली होती, मात्र तेव्हाच्या निवडणुकीत सांगलीच्या अरुण लाड यांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून अर्ज भरला होता, तर भाजपकडून चंद्रकांत पाटील हे उभे राहिले होते. या निवडणुकीत केवळ दोन हजार मतांच्या फरकाने चंद्रकांत पाटील निवडून आले होते. पाटील यांना ६२ हजार मते मिळाली होती, तर सारंग पाटील याना ५९ हजार मते मिळालाय होती. या निवडणुकीतील वैशिष्ट्य म्हणजे राष्ट्रवादीचे बंडखोर उमेदवार अरुण लाड यांना महत्त्वाची २५ हजारांहून अधिक मते मिळाली होती. त्यामुळे राष्ट्रवादीला निसटता प्रभाव स्वीकारावा लागला होता.

यावर्षीही तीच परिस्थिती निर्माण झाली आहे. पुणे पदवीधर मतदारसंघात कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर आणि पुणे जिल्ह्यांचा समावेश होतो. राष्ट्रवादीकडून या मतदारसंघात राष्ट्रवादीचे नेते उमेश पाटील, मोहोळचे बाळराजे पाटील, श्रीमंत कोकाटे आणि कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक भैया माने इच्छुक होते, यापैकी भैया माने यांनी अरुण लाड यांच्या विरोधात बंडखोरी केली आहे. माने यांच्या अर्ज दाखल करतेवेळी राष्ट्रवादीचे कोल्हापूर जिल्हाध्यक्षही उपस्थित होते. अर्ज भरण्याची शेवटची तारीख १७ नोव्हेंबर आहे, त्यामुळे भैया माने आपला उमेदवारी अर्ज मागे घेतात का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button