breaking-newsताज्या घडामोडीपुणे

पुणे जिल्ह्यातील दीड लाख मतांची होणार पडताळणी – जिल्हाधिकारी

पुणे – जिल्ह्यातील चारही लोकसभा मतदार संघातील एकूण 120 मतदान केंद्रांमधील तब्बल दीड लाख व्हीव्हीपॅट चिठ्ठयांची मोजणी केली जाणार आहे. त्यामुळे पोस्टने प्राप्त झालेल्या मतपत्रिकांची आणि ईव्हीएममधील मतांची मतमोजणी पूर्ण झाली तरी अंतिम निकाल जाहीर होणार नाही. चिठ्ठ्यांच्या साहाय्याने लॉटरी काढून निवडण्यात आलेल्या मतदान केंद्रांच्या स्लिपांची मोजणी झाल्यानंतरच खासदारकीची माळ कोणाच्या गळात पडणार याची अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे.

येत्या २३ तारखेला लोकसभा निवडणुकीची मतमोजणी होणार आहे. निकाल कधी लागणार या बद्दलची कमालीची उत्सुकता नागरिकांमध्ये आहे. मात्र गुरुवारी (दि. २३) संध्याकाळी उशीरापर्यंत निकाल जाहीर होण्याची शक्यता नाही. त्यातही व्हीव्हीपॅट चिठ्यांची मतमोजणी, उमेदवारांचे आक्षेप यावरुन वाद उद्भवल्यास निकाल आणखी लांबू शकतो, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले. वास्तविक ईव्हीएमवर मतदान झाल्याने मतमोजणी कमीत कमी वेळेत होणे अपेक्षित असते.

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या सुचनेनुसार, जिल्ह्यातील चार मतदार संघांचे मतदान दोन वेगवेगळ्या टप्प्यात घेण्यात आले. पुणे व बारामती मतदार संघाचे मतदान २३ एप्रिलला तर आणि शिरूर व मावळ मतदार संघाचे मतदान २९ एप्रिलला झाले. देशातल्या सर्व लोकसभा मतदारसंघांमधल्या मतदानाचा अंतिम टप्पा रविवारी (दि. १९) संपतो आहे. त्यानंतरच देशातली मतमोजणी होणार आहे. जिल्हा प्रशासनानेही मतमोजणीसाठी आवश्यक असलेली सर्व तयारी पूर्ण केली असून मतदार संघनिहाय आणि प्रत्येक टेबल निहाय कर्मचा-यांच्या नियुक्तीचे नियोजन केले आहे.

जिल्ह्यातील पुणे, बारामती, शिरूर आणि मावळ या चारही लोकसभा मतदार संघातील मतदान केंद्रांच्या चिठ्ठ्या तयार केल्या जाणार आहेत. प्रत्येक लोकसभा मतदार संघांतर्गत येणा-या विधानसभा मतदार संघातील पाच मतदान केंद्रांची चिठ्ठ्यांमधून लॉटरी काढली जाईल.त्यानंतर ईव्हीएममधील मते आणि व्हीव्हीपॅटमध्ये जमा झालेल्या स्लिप्स यातील मतांची पडताळणी होईल.पुणे लोकसभा सभा मतदार संघातील कसबा, शिवाजीनगर, वडगावशेरी, कोथरूड ,पर्वती आणि पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड या सर्व मतदार संघातील प्रत्येकी पाच मतदान केंद्रांमधील मतांची मोजणी करण्यात येईल.त्यामुळे एका लोकसभा मतदार संघातील 30 मतदान केंद्रांची मोजणी होईल.तर चार लोकसभा मतदान केंद्रांमधील 120 मतदान केंद्रांची मोजणी करण्यात येईल.
………..

यंदा प्रथमच व्हीव्हीपॅट मधील स्लिपांची मोजणी केली जाणार आहे. सर्वसाधारणपणे एका मतदान केंद्रावर बाराशे ते दीड हजार मतदान झाले असण्याची शक्यता आहे. त्यामुळे 120 मतदान केंद्रांमधील तब्बल दीड लाख व्हीव्हीपॅट स्लिप्सची मोजणी करावी लागेल. ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मधील मते यात तफावत अढळून येण्याची शक्यता नाही. उमेदवारांनी यासंदर्भात काही आक्षेप घेतले तर त्यावर कोणता निर्णय घ्यावा,याबाबतही सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे.

– नवल किशोर राम, जिल्हाधिकारी

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button