breaking-newsताज्या घडामोडीपुणे

पुणेकर गारठले!

  • तापमान नीचांकी ७.४ अंशांवर; गारठा आणखी वाढण्याचा अंदाज

पुणे – निरभ्र आकाश आणि उत्तर भारतातील राज्यांकडून येणाऱ्या अतिथंड वाऱ्यांमुळे पुणे, पिंपरी- चिंचवड शहर आणि परिसरामध्ये तापमानाचा पारा चांगलाच घसरल्याने पुणेकर अक्षरश: गारठले आहेत. कमाल तापमानातही घट झाल्याने दिवसाही थंड वारे जाणवत आहेत. शुक्रवारी शहरात हंगामातील नीचांकी ७.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. थंड वाऱ्यांचे वाढते प्रवाह आणि निरभ्र आकाशाच्या स्थितीमुळे तापमानाचा पारा आणखी घसरून गारठा वाढू शकतो, असा अंदाज पुणे वेधशाळेकडून व्यक्त करण्यात आला आहे.

शहरात गेल्या आठवडय़ातही तापमानाचा पारा घसरला होता. मात्र, ढगाळ स्थिती निर्माण झाल्यामुळे त्यात वाढ झाली होती. त्यामुळे थंडी काहीशी कमी झाल्याचे चित्र होते. मात्र मागील तीन दिवसांपासून निरभ्र आकाश आणि उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे शहरातील तापमानाचा पारा चांगलाच खाली आला आहे. २५ डिसेंबरला १५.९ अंशावर असलेले किमान तापमान २७ डिसेंबरला एकदमच १० अंशांवर आले. किमान तापमानासह कमाल तापमानातही मोठय़ा प्रमाणावर घट झाली.

२४ डिसेंबरला ३२.३ अंश कमाल तापमान होते. ते २८ डिसेंबरला २५.५ अंशांपर्यंत खाली आले. त्यामुळे दिवसाही काही प्रमाणात गारवा जाणवतो आहे. किमान तापमान नीचांकी पातळीवर ७.४ अंशांपर्यंत खाली आले आहे. शहरातील हे तापमान सरासरीच्या तुलनेत ३.२ अंशांनी कमी आहे. त्यामुळे सध्या शहरात संध्याकाळनंतर ऊबदार कपडे घातल्याशिवाय बाहेर पडणे शक्य होत नाही. अनेक ठिकाणी रात्री शेकोटय़ा पेटविण्यात येत असल्याचेही चित्र आहे. त्याचप्रमाणे बहुतांश भागात पहाटे धुक्याची चादर दिसून येते.

गेल्या तीन दिवसांपासून शहरात थंडी वाढत आहे. सध्या शहराच्या आकाशातील स्थिती निरभ्र आहे. हीच स्थिती पुढील सहा ते सात दिवस कायम राहण्याची शक्यता आहे. ही स्थिती थंडीला पोषक असल्याने वातावरणात फारसे बदल न झाल्यास तापमानाचा पारा आणखी घसरून थंडी वाढणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येतो आहे.

डिसेंबरमध्ये तापमानात चढ-उतार

डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून शहर आणि परिसरामध्ये किमान तापमानात सातत्याने चढ-उतार नोंदविले गेले आहेत. महिन्याच्या सुरुवातीला किमान तापमान १२ अंशांच्या आसपास होते. त्यामुळे काहीशी थंडी होती. त्यानंतरच्या पाच ते सहा दिवसांनंतर तापमान एकदम १६ अंशांवर पोहोचल्याने थंडी गायब झाली. ११ डिसेंबरला ९.५ अंश, तर  १७ डिसेंबरला तापमान नीचांकी ८.३ अंशांपर्यंत खाली आल्याने थंडी वाढली. त्यानंतर तापमान ८ ते ९ अंशांवर स्थिर झाले असतानाच ढगाळ स्थितीमुळे  तापमान १३ ते १५ अंशांवर पोहोचले होते. ते २७ डिसेंबरला १० अंशांवर, तर २८ डिसेंबरला ७.४ अंशांपर्यंत खाली आले. कमाल तापमानातही या महिन्यात चढ-उतार झाला असून, ३२.८ ते २५.४ या दरम्यान शहरात कमाल तापमान नोंदविण्यात आले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button