पुणेकरांनी घाबरण्याचे कारण नाही, 27 जणांचे सॅम्पल निगेटिव्ह
पुणे | महाईन्यूज | प्रतिनिधी
करोनासंदर्भात पुण्यातून दिलासादायक बातमी आली आहे. पुण्यात करोनाचे एकूण 16 पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. तर, नवीन 27 जणांचे सॅम्पल निगेटिव्ह आले आहेत. विमानाने पुण्यात येणा-या प्रवाशांची रोज तपासणी सुरू आहे. त्यामुळे पुणेकरांनी घाबरून जाण्याचे कारण नाही, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
‘पुण्यामधील कंपन्यांच्या कामगारांना घरून काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. केवळ उत्पादन करणा-या कंपन्यांना सुट असेल. आयटी कंपन्यांना वर्क फ्रॉम होमचा पर्याय देण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत, असं दीपक म्हैसेकर म्हणाले. तसंच, आवश्यकतेनुसार शहरातील काही भागात कलम 144 लागू केले जाईल. पण संचारबंदी असणार नाही, असंही ते म्हणाले.
आठवडाभर पुरेल एवढाच शिधा भरा
पुण्यातील नागरिकांनी आठवडाभर पुरेल एवढेच सामान खरेदी करावे. दोन-दोन महिने पुरेल एवढा शिधा भरण्याची आवश्यकता नाही. दुकानांमध्ये खरेदीसाठी गर्दी करू नका, मॉल्स, जिम, सिनेमागृह बंद आहेत की नाही ते तपासण्यासाठी पोलिसांची पथकं तपासणी करत आहेत, अशी माहिती दीपक म्हैसेकर यांनी दिली.
पुण्यात काही निर्बंध घातले जातील. त्याचं उल्लंघन केल्यास कारवाई होईल. पोलीस आदेश निर्गमित करतील. यासंदर्भात पुणे पोलीस आयुक्तांसोबत बोलणी झाली आहे. त्यांच्या आदेशाचं पालन करणं सर्वांना बांधकारक राहील.
दीपक म्हैसेकर, विभागीय आयुक्त, पुणे