breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी मारहाण प्रकरण : राष्ट्रवादीच्या माजी उपमहापौरासह शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना अटक

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

पिंपरी विधानसभा मतदार संघात राजकीय पक्षांच्या दोन गटांमध्ये तुफान हानामारी झाली. याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात परस्परविरोधी दोन तक्रारी दाखल झाल्या आहेत. याप्रकरणी माजी महापौरांसह चारजणांना पोलिसांना ताब्यात घेतले आहे. हा प्रकार काल सोमवारी (दि. 21) दुपारी पिंपरी कॅम्पात घडला आहे.

अभिनव सुरेंद्रकुमार सिंग (वय 30, तपोवन मंदिराजवळ, पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार माजी महापौर डब्बू आसवानी यांच्यासह चारजणांना ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिनव सिंग हे बबलू सोनकर यांच्या मोटारीचे चालक आहेत. बबलू सोनकर हे शिवसेनेचे आमदार एड. गौतम चाबुकस्वार यांचे जावई आहेत. चाबुकस्वार हे शिवसेनेच्या तिकीटावर पिंपरी विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवित आहेत. काल सोमवारी मतदान असताना सोनकर आणि त्यांचे कार्यकर्ते मतदार संघातून फिरत होते. दुपारी साडेबारावाजता सोनकर हे डब्बू आसवानी यांच्या घरासमोर आले. आसवानी यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांची गाडी अडवली. अनिल पारचा, उमाशंकर राजभरव आणि अभिनव यांना लाकडी बांबू, सिमेंटचे गट्टू यांनी मारहाण केली. यात ते गंभीर जखमी झाले. यावरून डब्बू आसवानी आणि त्यांच्या तीन साथिदारांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

याच्या विरोधात डब्बू आसवानी यांनी देखील परस्पर विरोधी तक्रार दिली आहे. त्यानुसार बबलू सोनकर (वय 40, रा. तपोवन मंदिराजवळ, पिंपरी), जितू मंगतानी (वय 32), अरुण टाक (वय 40), दीपक टाक (वय 38), लच्छू बुलाणी (वय 55), मोहित बुलाणी (वय 30), अनिल पारचा (वय 35, सर्व रा. पिंपरी) तसेच, बबलू सोनकर यांचे तीन बॉडीगार्ड व इतर साथीदार (नाव व पत्ता माहिती नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी आरोपींनी बेकायदा जमाव जमवून आसवानी यांच्या घरासमोर गोंधळ घातला. अरुण टाक, दीपक टाक यांनी आसवानी यांना पकडले आणि ”बबलू इसको खलास कर दे” असे म्हणत, मारहाण केली. सोनकर यांनी आसवानी यांना जीवे मारण्याच्या उद्देशाने पिस्तूल काढून आसवानी यांच्या डोक्याला लावले. जितू मंगतानी यांनी त्याच्याकडील पिस्तूल कार्यकर्त्यांवर रोखून कोणी मध्ये पडल्यास खल्लास करून टाकण्याची धमकी दिली. आसवानी यांना जबरदस्तीने मोटारीत बसवण्याचा प्रयत्न केला.

या तक्रारीनुसार बबलू सोनकर, जितू मंगतानी आणि लच्छू बुलाणी यांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी आरोपींकडून दोन पिस्तुल, 11 जिवंत काडतुसे आणि इनोव्हा कार जप्त केली आहे. सहायक पोलीस निरीक्षक सुधीर चव्हाण तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button