breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादीचा ‘चाणक्य’ माजी आमदार विलास लांडे ‘ इज ऑन फिल्ड’!

भोसरी विधानसभा मतदार संघात आढावा बैठकांची सुरूवात

आगामी महापालिका निवडणुकीसाठी जोरदार मोर्चेबांधणी

पिंपरी । विशेष प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवडमधील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा ‘ढाण्या वाघ’ माजी आमदार विलास लांडे आता सक्रीय झाले आहेत. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भोसरी विधानसभा मतदार संघात पदाधिकारी-नगरसेवक आणि कार्यकर्त्यांच्या बैठकांचा सपाटा सुरू झाला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने शहरात प्रभागनिहाय पदाधिकारी- कार्यकर्ते यांच्या बैठका सुरू आहेत. शुक्रवारी भोसरी विधानसभा मतदारसंघांतर्गत माजी नगरसेविका मंदा आल्हाट यांच्या निवासस्थानी बैठक घेण्यात आली. यावेळी माजी नगरसेवक अरुण बोऱ्हाडे,माजी नगरसेवक लोखंडे, शिक्षण समितीचे माजी सभापती धनंजय भालेकर, माजी नगरसेविका मंदा आल्हाट,राष्ट्रवादीचे शहर उपाध्यक्ष अतिश बारणे आदी उपस्थित होते.

दरम्यान, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांनी पिंपरी-चिंचवड दौरा केला होता. त्यावेळी लांडे यांनी सक्रिय व्हावे, अशा सूचना करण्यात आल्या होत्या. त्यानंतर लांडे यांच्याकडे महाविकास आघाडी सरकारमध्ये महत्त्वाची जबाबदारी देण्यात येणार आहे, अशीही चर्चा आहे.

सत्ताधारी भाजपाचे शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे भोसरी विधानसभेचे प्रतिनिधीत्व करतात. त्यांना शह देण्यासाठी आणि विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी माजी आमदार विलास लांडे महापालिका निवडणुकीची मोर्चेबांधणी करीत आहेत.

जगताप- लांडगे यांची डोकेदुखी वाढणार…

भोसरीचे विद्यमान आमदार महेश लांडगे सध्या भाजपाचे शहराध्यक्ष आहेत. चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप आणि लांडगे यांच्या नेतृत्त्वाखाली आगामी महापालिका निवडणुका लढवल्या जातील. त्याला तोडीस तोड स्थानिक चेहरा  राष्ट्रवादीकडून दिला जाईल. त्यासाठी ‘सेलिब्रेटी’ प्रचारक म्हणून खासदार डॉ. अमोल कोल्हे यांची साथ मिळणार आहे. तसेच, चिंचवडमधून शिवसेना गटनेता राहुल कलाटे यांनीही रान तापवण्यास सुरूवात केली आहे. परिणामी, लांडगे-जगताप जोडीची डोकेदुखी वाढणार आहे.

शहरातील महाविकास आघाडी एकवटली…

दरम्यान, हाथरस घटनेचा निषेध करण्यासाठी व आई – बहिणींच्या सन्मानार्थ मेहतर बाल्मिकी समाज पुणे – पिंपरी चिंचवड सर्वपक्षीय नागरिक, आंबेडकरी, अल्पसंख्यांक व दलित पक्ष संघटना यांच्या वतीने रविवारी (दि. 11 ऑक्टोबर) ‘मशाल महारॅली’ चे आयोजन करण्यात आले आहे. याची माहिती देण्यासाठी शुक्रवारी पिंपरी येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत माजी आमदार विलास लांडे पाटील, ॲड. गौतम चाबुकस्वार, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, शिवसेना शहर प्रमुख योगेश बाबर, आरपीआयचे शहराध्यक्ष सुरेश निकाळजे, माजी नगरसेवक अरुण टाक, माजी नगरसेवक धनराज बिर्दा, काळूराम पवार, वंचित विकास आघाडीचे अनिल जाधव, महाराष्ट्र कष्टकरी पंचायतचे अध्यक्ष कामगार नेते बाबा कांबळे, रिपब्लिकन युवा मोचार्च नेते राहुल डंबाळे, राजू परदेशी तसेच अनिता साळवे, कुल जमाती तंजीमचे मौलाना नैय्यर नुरी, माधव मुळे, राम बनसोडे, प्रमोद क्षिरसागर, मोहन कुंडीया आदी उपस्थित होते. उत्तरप्रदेशमध्ये भाजपाची सत्ता आहे. तेथील मुख्यमंत्री आदित्यनाथ यांचे सरकार बरखास्त करावे, अशी मागणी लांडे यांनी पत्रकार परिषदेत केली. त्यामुळे शहरातील महाविकास आघाडी आता भाजपाविरोधात एकवटल्याचे दिसत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button