breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी चिंचवडमध्ये चोवीस तास पाणीपुरवठ्याचे काम संथगतीने

पिंपरी महाईन्यूज प्रतिनिधी

शहराच्या विविध भागांमध्ये चोवीस तास पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू आहे. यासोबतच अनेक प्रभागांमध्ये रस्ता कॉंक्रीटीकरण, पदपथांची दुरुस्ती अशी कामे सुरू आहेत. त्यासाठी ठिकठिकाणी रस्ते खोदण्यात आले आहेत. अनेक ठिकाणी रस्ते खोदल्यामुळे सांडपाणी वाहून नेणाऱ्या वाहिन्या फुटल्या आहेत. परिणामी खोदलेल्या रस्त्यांमध्ये सांडपाणी साचून राहते. त्यामुळे परिसरात दुर्गंधी आणि अस्वच्छता पसरली आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे.

शहरातील पिंपळेगुरव, नवी सांगवी, पिंपळेसौदागर यासह रूपीनगर, तळवडे या भागात अमृत योजनेअंतर्गत काम सुरू आहे. पावसाळा संपल्यानंतर दरवर्षी खासगी मोबाईल कंपन्या आणि शासकीय यंत्रणांना विविध प्रकारच्या सेवा पुरविण्यासाठी रस्ते खोदाई करण्यास परवानगी देण्यात येते. पाणीपुरवठ्यासाठी जलवाहिन्या टाकणे, जलःनिसारणाची कामे, भूमिगत गटारे आणि विविध केबल डक्‍टसाठी शहरात सर्वत्र रस्ते खोदाई सुरू आहे.

डांबरीकरणाचे रस्ते पूर्णपणे उखडले आहेत. तसेच नेमलेले ठेकदार अतिशय संथ गतीने काम करीत आहेत. काम पूर्ण झाल्यावर तेथील रस्ता दुरुस्तीकडे ठेकेदारांकडून दुर्लक्ष करण्यात येत आहे. रस्ता खोदून त्या ठिकाणचे काम पूर्ण करण्यासाठी निश्‍चित कालमर्यादा पाळली जात नाही. त्यामुळे सांडपाण्याच्या वाहिन्या व भुमिगत गटारांमधून सांडपाणी खोदलेल्या भागामध्ये साचून राहते. तसेच, अनेक ठिकाणी बांधकामासाठी सोडलेले पाणी खड्ड्यांमध्ये साचते. पर्यायाने डासोत्त्पत्ती होत आहे. तसेच सांडपाणी साचल्यामुळे परिसरामध्ये दुर्गंधी पसरते आहे.

पिंपळे गुरव येथील राजमाता जिजाऊ उद्यानासमोर भुमिगत गटाराचे काम सुरू आहे. येथील पीएमपीएल बसस्थानकाभोवतीचा संपूर्ण रस्ता खोदला आहे. ड्रेनेजलाइनसाठी चार ते पाच फूट खोल रस्ता खोदला आहे. येथील काम संथगतीने सुरू असल्याने खोदलेल्या रस्त्यामध्ये सांडपाणी साचून राहत आहे. त्यामुळे दुर्गंधी पसरली आहे. नागरिकांच्या आरोग्यासाठी ही बाब घातक ठरू शकते.

नागरिकांकडून कारवाईची मागणी
शहरामध्ये सुरू असलेल्या खोदकामामुळे नागरिकांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. रस्त्यावर पसरलेल्या राडारोड्यामुळे वाहतुकीला अडथळा होत आहे. तसेच, यामुळे मोठ्या प्रमाणावर धुळ पसरत आहे. शहरामध्ये सध्या साथीच्या आजारांनी डोके वर काढले आहे. डेंग्यूच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यातच खोदलेल्या रस्त्यांमध्ये सांडपाणी साचल्याने समस्या अधिकच गंभीर होत आहे. सांडपाणी साचलेल्या भागातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्‍न गंभीर होत आहे. त्यामुळे अशा प्रकारे संथ गतीने काम करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

ठेकेदारांने कामाची गती वाढविणे आवश्‍यक आहे. भुमिगत गटारे, अमृत योजनेअंतर्गत खोदलेले रस्ते तातडीने बुजविणे आवश्‍यक आहे. याबाबत ठेकेदारांना वारंवार सूचना देण्यात येत आहेत

राजन पाटील, शहर अभियंता

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button