breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी-चिंचवडच्या खासगी रुग्णालयांना दणका, उपलब्ध बेडची संख्या पालिकेच्या डॅशबोर्डवर होणार अपडेट

पिंपरी |महाईन्यूज|

कोरोना रुग्णांसाठी बेड उपलब्ध असूनही एखादा रुग्ण आल्यानंतर बेड शिल्लक नसल्याचे सांगत हेळसांड करीत होते. त्यामुळे आयुक्त श्रावण हर्डिकर यांनी सक्त आदेश दिल्यामुळे महापालिकेने खासगी रुग्णालयांमधील उपलब्ध बेड आणि उपचार सुरू असलेल्या बेडची संख्या आजपासून (शनिवार १८ जुलै) अपडेट करण्यास सुरूवात केली आहे. आता शहरातील कोणत्या खासगी रुग्णालयात किती बेड शिल्लक आहेत हे नागरिकांना घरबसल्या आपल्या मोबाईलवर ऑनलाइन पाहता येणार आहे. शहरातील जागरूक नागिरकांनी ही माहिती गरजवंतांपर्यंत पोहोचवावी. जेणेकरून कोणताही कोरोना रुग्ण उपचारांपासून वंचित राहू शकणार नाही, असे आवाहन आमदार लक्ष्मण जगताप यांनी केले आहे.

पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोना रुग्णांची वाढ होत आहे. शनिवारी १८ जुलै रोजी शहरातील एकूण कोरोना रुग्णसंख्येने १० हजारांचा आकडा पार केला आहे. त्यातील अॅक्टिव्ह रुग्णसंख्या साडेतीन हजारांपेक्षा जास्त आहे. कोरोना होणाऱ्या प्रत्येक रुग्णाला महापालिकेच्या विविध रुग्णालयांमध्ये उपचार करणे शक्य नाही. त्यामुळे सरकारने आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत कोरोना रुग्णांवरील उपचारांसाठी खासगी रुग्णालये ताब्यात घेण्याची मुभा त्या त्या स्थानिक स्वराज्य संस्थांना दिली आहे. तसेच खासगी रुग्णालयांनी त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या एकूण बेडपैकी ८० टक्के बेड कोरोना रुग्णांवरील उपचारासाठी ठेवणे कायद्याने बंधनकारक करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे कोरोना आजार तसेच अन्य आजारांवर किती उपचार खर्च आकारायचे याचे दरही सरकारने निश्चित करून दिले आहेत.

हा कायदा असूनही शहरातील खासगी रुग्णालये कोरोना रुग्ण आणि अन्य आजार झालेल्या रुग्णांना अक्षरशः लुबाडत असल्याची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. त्यातच आता एखादा कोरोना रुग्ण उपचारासाठी गेला की बेड उपलब्ध नसल्याचे सांगून खासगी रुग्णालये संबंधित रुग्णाला माघारी पाठवत असल्याची प्रकरणेही समोर आली आहेत. त्यामुळे खासगी रुग्णालयांबाबत नागरिकांमध्ये सध्या संतापाचे वातावरण आहे. अशा परिस्थितीत आमदार लक्ष्मण जगताप यांनी शहरातील खासगी रुग्णालयांना दणका दिला आहे. आमदार जगताप यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याशी चर्चा करून शहरातील सर्व खासगी रुग्णालयांमध्ये किती कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत आणि किती बेड शिल्लक आहेत याची माहिती दररोज अपडेट करण्याचे आदेश दिले आहेत.

महापालिकेच्या डॅशबोर्डमधील “बेड व्हॅकन्सी” या कॉलममध्ये शहरातील सर्व खासगी रुग्णालयांची नावे आणि तेथे उपलब्ध असलेल्या बेडची माहिती उपलब्ध करुन देण्यात आली आहे. तसेच संबंधित रुग्णालयांचे दूरध्वनी क्रमांक डॅशबोर्डवर अपडेट करण्याचे काम महापालिकेकडून सुरू आहे. दररोज सकाळी ११ वाजता आणि सायंकाळी ६ वाजता उपलब्ध बेडची माहिती डॅशबोर्डवर अपडेट केली जाणार आहे. त्यामुळे नागरिकांना आता घरबसल्या शहरातील कोणत्या खासगी रुग्णालयात किती बेड उपलब्ध आहेत याची माहिती आपल्या मोबाईलवर ऑनलाइन उपलब्ध होणार आहे. तसेच खासगी रुग्णालये सुद्धा आता आमच्याकडे बेड उपलब्ध नाहीत असे सांगून कोणाला उपचार नाकारू शकणार नाहीत. शहरातील नागरिकांनीही थोडे जागरून होऊन गरजवंतांपर्यंत ही माहिती पोहोचवावी, असे आवाहन आमदार लक्ष्मण जगताप यांनी केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button