breaking-newsमहाराष्ट्र

पावसामुळे मध्य रेल्वेवरील वाहतूक विस्कळीत

मुसळधार पावसाचा मध्य रेल्वेलाही फटका बसला असून कर्जत- चौक दरम्यान रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने लांब पल्ल्यांच्या एक्स्प्रेस गाड्यांची सेवा विस्कळीत झाली आहे. भुसावळ – पुणे एक्स्प्रेस कल्याण – कर्जत मार्गावरुन तर पुणे – भुसावळ एक्स्प्रेस दौंड- मनमाड मार्गावरुन पळवण्यात आली आहे. तर कल्याण – कर्जत मार्गावर विठ्ठलवाडीजवळ रेल्वे रुळावर  पाणी साचल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. दुपारनंतर या मार्गावरील वाहतूक पूर्ववत झाली असली तरी यामुळे लोकल गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले.

मुंबई, ठाणे, वसई- विरार आणि रायगड या भागांना मुसळधार पावसाने झोडपले असून पावसामुळे मध्य रेल्वेवरील वाहतूक विलंबाने सुरु आहे. मध्य रेल्वेवरील लोकल गाड्यांची वाहतूक १० ते १५ मिनिटे उशिराने सुरु आहे. तर कर्जत – चौक दरम्यान रुळावर पाणी साचल्याने या मार्गावरील वाहतूक मंदावली आहे. कर्जतचा बोगदा आणि कर्जत रेल्वे स्थानकादरम्यान ज्ञानदीप सोसायटी शेजारून वाहणारा नाला दुथडी भरुन वाहू लागल्याने रेल्वे रुळावर पाणी साचले. यामुळे पुण्याहून पनवेल मार्गे मुंबई कडे जाणाऱ्या व मुंबईहून पनवेल मार्गे पुण्याकडे जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्या कल्याण मार्गे मुंबई कडे आणि पुण्याकडे वळवण्यात आल्या. यामुळे प्रवाशांची चांगलीच पंचाईत झाली. रुळांवर जवळपास १० ते ११ सेंमी. पाणी साचल्याचे रेल्वेतर्फे सांगण्यात आले आहे.

कर्जत – चौक दरम्यान रुळावर पाणी साचल्याने ११०२५ भुसावळ- पुणे एक्स्प्रेस कल्याण- कर्जत मार्गावरुन वळवण्यात आली आहे. तर ११०२६ पुणे- भुसावळ एक्स्प्रेस दौंड – मनमाडमार्गे वळवण्यात आली आहे. तर १२१२६ प्रगती एक्स्प्रेस आणि १७६१४ नांदेड – पनवेल एक्स्प्रेसही कर्जत – पनवेलऐवजी कर्जत – कल्याण मार्गावर वळवण्यात आली आहे. माथेरान – अमन लॉज दरम्यानही रुळावर झाड पडल्याची माहिती रेल्वेतर्फे देण्यात आली आहे.

कर्जत – पनवेल मार्गावरील वाहतूक ठप्प असतानाच कल्याण – कर्जत मार्गावरही विठ्ठलवाडीजवळ रेल्वे रुळावर  पाणी साचल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. दुपारनंतर या मार्गावरील वाहतूक पूर्ववत झाली असली तरी यामुळे लोकल गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button