breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पार्थ पवारांचा मावळात राबता वाढल्याने इच्छुकांमध्ये धाकधूक

  • अजोबांसोबत पहिल्यांदाच झळकते फ्लेक्सवर प्रतिमा
  • मावळ लोकसभेच्या उमेदवारीचे मिळतात संकेत

– अमोल शित्रे

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – राष्ट्रवादीचे कारभारी अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार हे मावळ लोकसभा मतदार संघातून राष्ट्रवादीच्या तिकीटावर निवडणूक लढविणार असल्याचे संकेत आता दृढ होत चालले आहेत. पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात झळकत असलेल्या फ्लेक्सवर देखील पार्थ यांची प्रतिमा पहिल्यांदाच पहायला मिळत आहे. त्यातच आज नाना काटे फाऊंडेशनच्या नोकरी मेळाव्यात देखील या नवीन पवारांची उपस्थिती बोलकी ठरल्याने मावळ लोकसभा लढण्याकरता राष्ट्रवादीच्या तिकीटासाठी अजित पवारांकडे अपेक्षा धरून बसलेल्या पिंपरीतील दोन इच्छुकांची धाकधूक चांगलीच वाढली आहे.

मुंबईत शरद पवार यांनी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने उमेदवारांची चाचपणी करण्यासाठी घेतलेल्या बैठकीत मावळ लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढण्यासाठी राष्ट्रवादीचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील आणि नेते भाऊसाहेब भोईर या दोघांनी इच्छा प्रकट केली आहे. त्या दृष्टीने वाघेरे-पाटलांची मावळ, कर्जत-खालापुर, उरण, पनवेल भागात जोरदार तयारी सुरू आहे. तर, रायगड जिल्ह्यातील कोकण किनारपट्टीलगतच्या आगरी समाजाशी ऋणानुबंध असल्याने निवडणुकीची जास्त तयारी करावी लागणार नाही, असा भोईरांचा आत्मविश्वास आहे. मावळातील भेगडे कंपनी नातेवाईक असल्याने त्याठिकाणीही आपला शब्द खाली पडू देणार नाहीत, अशी खात्री भोईरांना आहे. त्यांनी मावळसाठी इच्छा व्यक्त केली असली तरी, पक्षाने आपल्या नावाची घोषणा केल्यानंतरच आपण निवडणूक लढणार, अशी त्यांची भूमिका आहे. परंतु, वाघेरे पाटलांची तळमळ ही वेगळीच आहे. त्यांना कोणत्याही परिस्थितीत मावळ लोकसभा लढायची आहे. तिकीटासाठी त्यांचा अजित पवारांकडे अटोकाट प्रयत्न सुरू आहे. मात्र, पार्थ पवार यांचा मावळ मतदार संघात राबता वाढल्याने दोन्ही इच्छुकांची धाकधूक चांगलीच वाढली आहे, अशी चर्चा राष्ट्रवादीच्या पदाधिका-यांमध्ये सुरू आहे.

गेल्या काही महिन्यांपासून मावळात पार्थ पवारांचे दौरे वाढले आहेत. उरण, पनवेल याठिकाणी शेतकरी कामगार पक्षाच्या नेत्यांचीही त्यांनी भेट घेतली आहे. त्यातच शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरी-चिंचवड शहरात झळकत असलेल्या फ्लेक्समध्ये या नवीन पवारांची प्रतिमा संकेत देऊन जात आहे. आज नाना काटे सोशल फाऊंडेशनच्या नोकरी मेळाव्यात देखील त्यांची उपस्थितीत बोलकी ठरली आहे. यावरून मध्यंतरी अजित पवार यांनी पार्थ पवार हे मावळ लोकसभा लढविणार असल्याचे संकेत दिले होते. ते संकेत आता खरे भासू लागले आहेत. पार्थ पवारांना मावळातून उमेदवारी दिली तर वाघेरे-पाटलांचे पक्षांतर्गत खच्चीकरणच होणार आहे. कदाचीत भोईरांना या सर्वांची कल्पना असल्यामुळेच की काय, त्यांनी लोकसभा निवडणुकीचा निर्णय घेण्यापुरते आपले राजकीय भवितव्य पक्षावर सोपविले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button