breaking-newsपुणेमहाराष्ट्र

पाणी मीटरसाठी नववर्षी मुहूर्त

पहिल्या टप्प्यात सव्वा लाख मीटर बसवण्याचे उद्दिष्ट

पुणे : बहुचर्चित आणि दहा वर्षांपासून कोणत्या ना कोणत्या कारणामुळे रखडलेल्या पाणी मीटर योजनेला अखेर गती मिळणार आहे. पाण्याचे मीटर बसविण्यासाठीचे सर्वेक्षण पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून पूर्ण करण्यात आले असून नव्या वर्षांत निवासी आणि व्यावसायिक मिळकतींना पाण्याचे मीटर बसविण्याचे काम सुरू होणार आहे. एक हजार लिटर पाण्यासाठी निवासी मिळकतींना साडेसहा रूपयांच्या आसपास दर राहणार आहे.

पाण्याचा मोठय़ा प्रमाणावर होत असलेला अपव्यय आणि वितरणातील गळती या पाश्र्वभूमीवर घरोघरी पाण्याचे मीटर बसविण्याची योजना दहा वर्षांपूर्वी तयार करण्यात आली होती. शहरातील पाच प्रभागात प्रायोगिक तत्त्वावर ही योजना राबविण्यासाठी आराखडा करण्यात आला. मात्र ही योजना पुढे सरकू शकली नाही. त्यानंतर स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत समान पाणीपुरवठा योजनेला महापालिकेने मान्यता दिली. त्यानुसार एक हजार ६०० किलोमीटर लांबीच्या जलवाहिन्या नव्याने टाकणे, जुन्या जलवाहिन्यांची दुरुस्ती, साठवणूक टाक्यांची उभारणी आणि पाण्याचे मीटर बसविणे अशा तीन टप्प्यात ही कामे प्रस्तावित करण्यात आली. या कामांसाठी एकूण दोन हजार ६०० कोटींचा खर्च अपेक्षित आहे.

या योजनेनुसार जलवाहिन्या टाकण्याच्या कामांना अद्याप प्रारंभ झालेला नाही. मात्र साठवणूक टाक्यांची उभारणी आणि पाण्याचे मीटर बसविण्यासाठीचे सर्वेक्षण करण्यास पाणीपुरवठा विभागाकडून प्रारंभ झाला होता. पाण्याच्या मीटरसाठी सर्वेक्षण करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून नव्या वर्षांत निवासी आणि व्यावसायिक मिळकतींना मीटर बसविण्यात येणार आहेत. पहिल्या टप्प्यात किमान सव्वा लाख मीटर बसविण्याचे उद्दिष्ट पाणीपुरवठा विभागाकडून ठेवण्यात आले आहे. पाण्याचा दरही निश्चित झाला आहे. पालिकेची जलवाहिनी आणि घरात असलेली पाणीपुरवठय़ाची वाहिनी यांच्यावर महापालिकेकडून मीटर बसविण्यात येईल. डिजिटल आकडे असणारे हे मीटर असून त्यामध्ये संवेदक बसविण्यात आले आहेत. त्यामुळे किती लिटर पाण्याचा वापर झाला, हे कळू शकेल.

पहिल्या एक हजार लिटरसाठी साडेसहा रूपये या दराने पाणीपुरवठा होणार असून त्यापुढे पाण्याचा वापर झाल्यास दर हजारी लिटरला वेगळा दर असेल. त्यासाठी दरांचे टप्पे निश्चित करण्यात आले आहेत. पालिकेने केलेल्या सर्वेक्षणात साडेतीन लाख मिळकतींना मीटर बसवावे लागतील अशी माहिती संकलित झाली होती. पाण्याचे मीटर जर्मन कंपनीकडून घेण्यात येणार आहेत. नव्या वर्षांत प्रारंभी ४५ हजार व्यावसायिक मिळकतींना मीटर बसविण्यात येतील. त्यानंतर जून-जुलै महिन्यात ८५ हजार निवासी मिळकतींना मीटर बसविण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे.

दरमहा देयक

पाण्याच्या वापरापोटी महापालिकेकडून वार्षिक स्वरूपात पाणीपट्टी आकारली जाते. पाण्याचे मीटर बसविल्यानंतर वीज मंडळाप्रमाणेच पाण्याच्या वापरानुसार दरमहा देयक (बिल) देण्यात येणार आहे. जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या निकषाप्रमाणे प्रती माणशी १५० लिटर पाणीपुरवठा गृहीत धरण्यात आला आहे. एक हजार लिटरसाठी निवासी मिळकतींचा दर साडेसहा रुपये असा राहणार असून त्यानंतरच्या वापरासाठीचा दर वेगळा असेल.

नोंदी घेणे सुलभ होणार

मीटर बसविण्यात आल्यानंतर पाणी वापराच्या नोंदी सहज घेता याव्यात, यासाठी सहज दिसतील अशा ठिकाणी मीटर बसविण्यात येणार आहेत. नळजोडाच्या आकारानुसार पाण्याचे मीटरही आकाराने कमी-अधिक राहणार आहेत. मीटरमध्ये फेरफार केल्यास संवेदकांमुळे त्याची माहिती मिळू शकेल.

मीटरसाठी ६०० कोटी

पहिल्या टप्प्यात व्यावसायिक आणि निवासी मिळकतींना मीटर बसविण्यासाठी ६०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. समान पाणीपुरवठा योजनेचा एकूण खर्च दोन हजार ६०० कोटी रुपये आहे. त्याला मंजुरी देण्यात आली आहे. प्रशासनाकडून निवासी मिळकतींना विनामूल्य मीटर बसवून देण्यात येणार आहेत.

मीटर बसविण्याच्या सर्वेक्षणाची प्रक्रिया पूर्ण झाली असून नव्या वर्षांत प्रत्यक्ष मीटर बसविण्याची कार्यवाही सुरू होईल. प्रारंभी व्यावसायिक मिळकतींना मीटर बसविण्यात येतील.

व्ही. जी. कुलकर्णी, अधीक्षक अभियंता, पाणीपुरवठा विभाग

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button