breaking-newsपुणेमहाराष्ट्र

‘थेस्पो रायटर्स व्हॉल्यूम’मधील संहितांवर पुण्याचा वरचष्मा

चार संहितांच्या पुस्तकामध्ये तीन नाटकांचे लेखक पुणेकर

पुणे : रंगभूमी क्षेत्रात मानाच्या समजल्या जाणाऱ्या ‘थेस्पो फेस्टिव्हल’च्या द्विदशकपूर्तीनिमित्त प्रकाशित करण्यात आलेल्या ‘थेस्पो रायटर्स व्हॉल्यूम’मधील संहितांवर पुण्याचा वरचष्मा राहिला आहे. दोन मराठी आणि हिंदूी व इंग्रजी भाषेतील प्रत्येकी एक; अशा चार संहितांची या पुस्तकासाठी निवड झाली असून त्यातील तीन नाटकांचे चार लेखक पुणेकर आहेत.

पंचवीस वर्षांखालील युवकांमध्ये रंगभूमी कलेची गुणवत्ता असते. त्या गुणवत्तेला व्यासपीठ देण्याच्या उद्देशातून गेल्या २० वर्षांपासून मुंबईमध्ये थेस्पो फेस्टिव्हलचे आयोजन केले जाते. ज्येष्ठ रंगकर्मी आणि अ‍ॅडगुरु अ‍ॅलेक पदमसी यांनी थेस्पो फेस्टिव्हलची मुहूर्तमेढ रोवली आहे. रंगभूमी क्षेत्रात या फेस्टिव्हलला अनन्यसाधारण महत्त्व आहे. मुंबईमध्ये नुकताच झालेला थेस्पो फेस्टिव्हल अ‍ॅलेक पदमसी यांना समर्पित करण्यात आला होता. या फेस्टिव्हलमध्ये ज्येष्ठ नाटय़समीक्षक शांता गोखले यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्याबरोबरच ‘थेस्पो रायटर्स व्हॉल्यूम’चे प्रकाशन करण्यात आले.

थेस्पो फेस्टिव्हलच्या द्विदशकपूर्तीनिमित्त  गेल्या वीस वर्षांत फेस्टिव्हलमध्ये सादर झालेल्या नाटकांच्या संहितांमधून चार नाटकांच्या संहितांची निवड करून ‘थेस्पो रायटर्स व्हॉल्यूम १’ या पुस्तकाद्वारे त्या प्रकाशित करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये सिद्धेश पूरकर याच्या ‘कबाडी-अनकट’ आणि भूषण पाटील याच्या ‘नाव’ या मराठी नाटकांचा,तर विराजस कुलकर्णी आणि शिवराज वायचळ यांनी लिहिलेल्या ‘भँवर’ या हिंदूी नाटकाचा समावेश आहे. हे चारही नाटककार पुण्याचे असल्याने ‘थेस्पो रायटर्स व्हॉल्यूम’वर पुणेकरांचा वरचष्मा राहिला आहे.  प्रसिद्ध रंगकर्मी इरावती कर्णिक आणि रामू रामनाथन यांनी या पुस्तकासाठीच्या नाटकांची निवड केली आहे. यामध्ये अजय कृष्णन याच्या ‘बटर अँड मॅश्ड बनाना’ या इंग्रजी नाटकाचा समावेश आहे. महाविद्यालयामध्ये असताना केलेलं एखादं नाटक पुस्तक स्वरूपात छापून येणं हा आमच्यासाठी सुखद धक्का असल्याची भावना सिद्धेश पूरकर याने व्यक्त केली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button