breaking-newsपुणे

पाऊण किलो वजनाचा ‘गोडवा’ बाजारात!

  • रायपूर पेरूचा हंगाम सुरू

अर्धा ते पाऊण किलो वजनाचा, कमी बियांचा आणि चवीला गोड अशा रायपूर जातीच्या पेरूंचा हंगाम सुरू झाला आहे. मार्केट यार्डातील फळबाजारात रायपूर पेरूची आवक सुरू झाली आहे. येत्या काही दिवसांत रायपूर पेरूची आवक वाढण्याची शक्यता आहे.

कमी बिया आणि चवीला गोड असणाऱ्या रायपूर जातीच्या पेरूचे वजन सहाशे ते नऊशे ग्रॅम म्हणजे अर्धा ते पाऊण किलो दरम्यान भरते. रायपूर जातीचा पेरूची लागवड बारामती, सातारा जिल्ह्य़ातील खटाव तालुक्यातील शेतकरी मोठय़ा प्रमाणावर करतात. रविवारी बारामती आणि खटाव भागातून एक टन रायपूर जातीच्या पेरूची आवक झाली. घाऊक बाजारात वजन आणि प्रतवारीनुसार प्रतिकिलो पेरूला ४० ते १०० रुपये असा दर मिळाला. मार्केट यार्डातील फळबाजारात गेल्या आठवडय़ापासून रायपूर पेरूची आवक सुरू झाली आहे. ग्राहकांकडून रायपूर पेरूला चांगली मागणी आहे. आकर्षक वेष्टनात रायपूर पेरू विक्रीसाठी उपलब्ध असल्याची माहिती पेरूचे व्यापारी संतोष ओसवाल यांनी दिली. काही वर्षांपूर्वी रायपूर पेरूची तुरळक आवक बाजारात होत होती. मात्र, गेल्या दोन ते तीन वर्षांत आवक वाढली आहे. कमी बिया, आकाराने मोठा व चवीला गोड पेरू आहे.

दीड एकरात नऊ लाखांचे उत्पन्न

गावरान पेरू आकाराने लहान असतो. रायपूर पेरू आकाराने मोठा असतो. ग्राहक मोठय़ा आकाराच्या पेरूकडे आकर्षित होतात. पाच वर्षांपूर्वी उत्तर प्रदेशातील पेरूची रोपे आणली होती. दीड एकरांत १२०० रोपांची लागवड केली असून तीन लाख रुपये खर्च आला. दरवर्षी १६ ते १७ टन उत्पादन मिळते. पेरूच्या हंगामात सरासरी नऊ लाख रुपये उत्पन्न मिळते, असे खटाव तालुक्यात असलेल्या कटगुण गावतील शेतकरी नितीन गायकवाड यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button