breaking-newsराष्ट्रिय

अतिरिक्त पोलीस महासंचालक हिमांशू रॉय यांची आत्महत्या !

  • कॅन्सरच्या आजाराला कंटाळून जीवनयात्रा संपवली

मुंबई- राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक आणि दहशतवाद विरोधी पथकाचे माजी प्रमुख हिमांशू रॉय यांनी आज प्रदीर्घ आजाराला कंटाळून आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे. गेली तीन वर्षे कॅन्सर या दुर्धर आजारावर सुरु असलेले उपचार व त्यामुळे आलेल्या नैराश्‍यातून रॉय यांनी स्वतःवर गोळी झाडून घेत आत्महत्या केली. एका कर्तबगार अधिकाऱ्यांच्या वादळी कारकिर्दीचा असा दुर्दैवी शेवट झाल्याने पोलीस दलासह सर्वच क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.

पोलीस दलातील अत्यंत तडफदार अधिकारी म्हणून ओळखले जाणारे हिमांशू रॉय गेली तीन वर्षे दुर्धर आजाराने त्रस्त होते. विदेशात व नंतर मुंबईत उपचार घेतल्यावर कर्करोगातून मुक्त होतायत असे वाटत असताना पुन्हा या रोगाचे उचल खाल्ली. यामुळे रॉय निराश होते. अखेर या आजाराला कंटाळून त्यांनी राहत्या घरी आपल्याकडील सर्व्हिस रिव्हॉल्वरमधून तोंडात गोळी झाडून घेऊन जीवनयात्रा संपवली.

हिमांशू रॉय यांनी आत्महत्या करण्यापूर्वी एक चिठ्ठी लिहून ठेवली असून त्यामध्ये आजाराला कंटाळून आपण आपले जीवन संपवत असल्याचे म्हटले आहे. रॉय यांनी गोळी झाडून घेतल्याचे लक्षात येताच त्यांच्या कुटुंबीयांनी व सुरक्षा रक्षकांनी त्यांना जवळच्या बॉम्बे इस्पितळात हलवले. परंतु तेथे पोचण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता.
राज्यपाल विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे-पाटील, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व माजी गृहमंत्री जयंत पाटील यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी व हिमांशू रॉय यांच्या समवेत काम केलेल्या त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला.

लक्षणीय कारकीर्द 
1988च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असलेल्या हिमांशू रॉय यांची कारकीर्द लक्षणीय होती. महत्त्वाची पदे भूषवताना त्यांनी अनेक महत्त्वाची व हायप्रोफाईल प्रकरणे हाताळली. आयपीएलमधील मॅच फिक्‍सिंगचे प्रकरण त्यांनीच बाहेर काढले होते. याशिवाय पत्रकार जे डे हत्या प्रकरण, दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्‍बाल कासकरचा चालक आरिफवर झालेला गोळीबार, विजय पालांडे यांचा सहभाग असलेले दुहेरी हत्या प्रकरण, लैला खान हत्या प्रकरण, तसेच पल्लवी पुरकायस्थ हत्या प्रकरणाचा समावेश आहे. दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख म्हणून त्यांची कारकीर्द गाजली होती.

कसाबच्या फाशीत महत्त्वाची भूमिका ! 
मुंबई दहशतवादी हल्ल्यात पकडला गेलेला एकमेव जिवंत दहशतवादी अजमल कसाब याला फासावर लटकवण्यात हिमांशू रॉय यांचा मोलाचा वाटा होता. कसाबला 21 नोव्हेंबर 2012 रोजी पुण्यातील येरवडा तुरुंगात फाशी देण्यात आली. याबाबत अत्यंत गुप्तता पाळण्यात आली होती. त्यामुळे मोजक्‍याच अधिकाऱ्यांना याबाबत कल्पना देण्यात आली होती. फाशीच्या अंमलबजावणीसाठी त्यावेळी गृहमंत्रीपदावर असणारे आर आर पाटील यांनी ज्या मोजक्‍या पोलीस अधिकाऱ्यांची निवड केली होती त्यात हिमांशू रॉय यांचाही समावेश होता. कसाब याला आर्थर रोड कारागृहातून पुण्याच्या येरवडा कारागृहापर्यंत नेण्याची जबाबदारी हिमांशू रॉय यांच्यावर होती. हिमांशू रॉय यांनी आपली चोख जबाबदारी पार पाडत कसाबला येरवड्यात पोहचवले होते.

एक कर्तव्यनिष्ठ अधिकारी गमावला ! – राज्यपाल 
राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी ज्येष्ठ पोलीस अधिकारी हिमांशू रॉय यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. हिमांशू रॉय एक कर्तव्यनिष्ठ पोलीस अधिकारी होते. पोलीस दलाचे ते बलस्थान होते. गुन्हे तपासात त्यांचा हातखंडा होता. आपल्या सेवाकाळात धारण केलेल्या प्रत्येक पदावर त्यांनी वैशिष्ट्‌यपूर्ण कामगिरी केली. त्यांच्या आकस्मिक निधनाने राज्याच्या पोलीस दलाचे मोठे नुकसान झाले आहे, असे राज्यपाल विद्यासागर राव यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.

कर्तबगार अधिकारी गमावला ! -मुख्यमंत्री 
राज्य आणि मुंबई पोलीस दलात अनेक महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या सांभाळणारे वरिष्ठ आयपीएस अधिकारी हिमांशू रॉय यांच्या मृत्यूबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोक व्यक्त केला. आपण एका कर्तबगार पोलीस अधिकाऱ्याला मुकलो असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे. पोलीस दलात विविध जबाबदाऱ्या सांभाळत असताना रॉय यांनी अनेक महत्त्वाच्या प्रकरणांचा छडा लावला. एक धडाडीचे पोलीस अधिकारी म्हणून त्यांचा नावलौकिक होता. त्यांच्या निधनामुळे आपण एका चांगल्या अधिकाऱ्याला मुकलो आहोत. हिमांशू रॉय यांच्या कुटुंबीयांना आणि आप्तस्वकियांना हे दुःख सहन करण्याचे बळ मिळो अशी प्रार्थना मी करतो. या सगळ्यांच्या दुःखात मी सहभागी आहे असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

अकाली एक्‍झिट ! -विखे 
हिमांशू रॉय यांच्या आत्महत्येचे वृत्त अत्यंत धक्कादायक आहे. त्यांच्या निधनामुळे महाराष्ट्राने एक कर्तबगार पोलीस अधिकारी गमावला. ते माझे अतिशय जवळचे मित्र होते. त्यामुळे त्यांच्या अकाली ‘एक्‍झिट’ने माझी मोठी वैयक्तिक हानी झाली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button