पत्नीला मोबाईलवर अश्लील मेसेज पाठविणा-या पतीवर विनयभंगाचा गुन्हा
पिंपरी, (महा-ई-न्यूज) – पत्नीच्या मोबाईलवर अश्लील मेसेज पाठवून मानसिक त्रास देणा-या पतीविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. पत्नीने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी पतीविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार पिंपरी-चिंचवडमधील कामगारनगर येथे घडला आहे.
३५ वर्षीय पत्नीच्या मोबाइलवर ३८ वर्षीय पती गेल्या काही महिन्यांपासून वारंवार अश्लील मेसेज करत होता. अखेर याला कंटाळून पत्नीने पिंपरी पोलीस ठाण्यात पतीविरोधात फिर्याद दिली. विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चार ते पाच वर्षांपासून पती पत्नीचे पटत नव्हते, दोघांमध्ये सतत वाद होत असत. अखेर दोघांनी वेगळं राहण्याचा निर्णय घेतला. पाच महिन्यांपासून ते वेगळं राहायला लागले. त्यांना मुलगा आणि मुलगी आहे.
मुलाचा सांभाळ पती करतात. ते नाशिक येथे वाहनचालक म्हणून काम करत आहेत. तर, पत्नी भावाकडे राहते. गेल्या काही महिन्यांपासून मोबाईलवर पती सतत पत्नीला अश्लील मेसेज करत होता. पत्नीने अनेक मेसेज डिलीट करत दुर्लक्ष केले. मेसेजचा अतिरेक वाढल्याने पत्नीने पिंपरी पोलिसांत धाव घेतली. पती विरोधात गुन्हा दाखल करण्याचा अर्ज त्यांनी दिला. त्यानुसार पतीवर गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक हरिदास बोचरे करत आहेत.