breaking-newsक्रिडा

न्यूझीलंडची विजयी सुरुवात, श्रीलंकेवर १० गडी राखून मात

केन विल्यमसनच्या न्यूझीलंड संघाने २०१९ विश्वचषकाची सुरुवात विजयाने केली आहे. सलामीच्या सामन्यात श्रीलंकेवर १० गडी राखून मात करत न्यूझीलंडने आपले इरादे स्पष्ट केले आहेत. भेदक माऱ्याच्या जोरावर श्रीलंकेला १३६ धावांवर गारद केल्यानंतर न्यूझीलंडने विजयासाठी दिलेलं १३७ धावांचं आव्हान सहज पूर्ण केलं. सलामीवीर मार्टीन गप्टील आणि कॉलिन मुनरोने अर्धशतक झळकावत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. मार्टीन गप्टीलने नाबाद ७३ तर मुनरोने नाबाद ५८ धावा केल्या. श्रीलंकेचा एकही गोलंदाज न्यूझीलंडची सलामीची जोडी फोडू शकला नाही.

त्याआधी, लॉकी फर्ग्युसन-मॅट हेन्री आणि अन्य गोलंदाजांनी केलेल्या भेदक माऱ्याच्या जोरावर न्यूझीलंडने आपल्या पहिल्याच सामन्यात श्रीलंकेला १३६ धावांवर रोखण्यात यश मिळवलं आहे. नाणेफेक जिंकून सामन्यात पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी सार्थ ठरवला. श्रीलंकेकडून कर्णधार दिमुथ करुणरत्ने आणि कुशल आणि थिसारा पेरेरा यांनी थोडीफार झुंज दिली.

पहिल्याच षटकात लहिरु थिरीमनेला माघारी धाडत मॅट हेन्रीने श्रीलंकेला पहिला धक्का दिला. यानंतर करुणरत्ने आणि कुशल पेरेरा यांनी दुसऱ्या विकेटसाठी छोटेखानी भागीदारी केली. मात्र पेरेरा माघारी परतल्यानंतर श्रीलंकेच्या डावाला पुन्हा एकदा गळती लागली. मधल्या फळीतला एकही फलंदाज न्यूझीलंडच्या गोलंदाजांचा सामना करु शकला नाही.

एकामागोमाग एक फलंदाज माघारी परतत असताना, कर्णधार दिमुथ करुणरत्नेने एक बाजू लावून धरली होती. अखेरच्या फळीत थिसारा पेरेराला साथीला घेत करुणरत्नेने आपलं अर्धशतक साजरं केलं. या भागीदारीमुळे श्रीलंकेने आव्हानात्मक धावसंख्येचा पल्ला गाठला. मात्र थिसारा पेरेरा माघारी परतल्यानंतर श्रीलंकेच्या शेपटाला झटपट गुंडाळत न्यूझीलंडने १३६ धावात लंकेच्या संघाला बाद केलं. कर्णधार करुणरत्ने ५२ धावांवर नाबाद राहिला. न्यूझीलंडकडून मॅट हेन्री आणि लॉकी फर्ग्युसन यांनी प्रत्येकी ३-३ बळी घेतले. त्यांना ट्रेंट बोल्ट, कॉलिन डी-ग्रँडहोम, जेम्स निशम, मिचेल सँटनर यांनी प्रत्येकी १-१ बळी घेतला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button