breaking-news

न्या. हक यांचे मुख्यालय बदलण्याला वकिलांचा विरोध

नागपूर | महाईन्यूज

मुंबई उच्च न्यायालयाचे न्या. झका हक यांचे मुख्यालय नागपूरहून औरंगाबादला बदलण्याचा निर्णय राज्याच्या मुख्य न्यायमूर्तीनी घेतला असून या निर्णयाला नागपूर खंडपीठातील वकिलांनी विरोध दर्शवला आहे. यासंदर्भात वकिलांनी स्वाक्षरी करून हायकोर्ट बार असोसिएशनच्या (एचसीबीए) सचिवांना निवेदन सादर केले व न्यायालयातील कामावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिलेला आहे.

न्या. झका हक यांचा जन्म अकोला येथे झाला. त्यांचे शिक्षण अकोला जिल्हयात झाले. त्यांचे वडील अकोला येथे जिल्हा न्यायालयात सराव करीत होते. १५ जानेवारी १९८५ मध्ये त्यांनी वडिलांसोबत वकिलीला सुरुवात केलेली आहे. ३ डिसेंबर १९८५ ला ते नागपुरात आले व त्यांनी अ‍ॅड. जे. एन. चांदुरकर यांच्या मार्गदर्शनात नागपूर खंडपीठात वकिलीला प्रारंभ केला आहे. यादरम्यान त्यांनी विषय व कायद्याची प्रकरणे हाताळली. एक निष्णात वकील म्हणून त्यांची ओळख असताना २१ जून २०१३ ला त्यांची उच्च न्यायालयाच्या अतिरिक्त न्यायमूर्तीपदी नियुक्ती झाली आहे. त्यांचे मुख्यालय नागपूर खंडपीठात होते.

प्रकरणांचा जलदगतीने निपटारा करण्यात त्यांचा हातखंडा आहे. परंतु कोणत्याही दबावात न येता न्यायनिवाडा करीत असल्याने काहींनी त्यांची तक्रार मुख्य न्यायमूर्तीकडे केली. या तक्रारींची शहानिशा न करताच काही दिवसांपूर्वी मुख्य न्यायमूर्तीनी त्यांचे मुख्यालय नागपुरातून औरंगाबादला हलवल्याचे सांगितले जाते. या बदलीविरुद्ध नागपूर खंडपीठातील वकिलांमध्ये नाराजीचा सूर असून अनेक वकिलांनी स्वाक्षरी अभियान राबवून बदलीला विरोध केला आहे. यासंदर्भात एचसीबीएच्या सचिवांना निवेदन सादर करून तातडीने सर्वसाधारण बैठक घेऊन बदलीविरुद्ध ठराव मंजूर करण्याची मागणी केली. तसेच न्या. हक हे मे २०२१ मध्ये निवृत्त होत असून त्यांना परत नागपूर मुख्यालयी पाठवण्याची मागणी करण्यात यावी, अन्यथा न्यायालयीन कामकाजावर बहिष्कार टाकण्याचा इशारा या निवदेनात देण्यात आलेला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button