breaking-newsराष्ट्रिय

नुसरत जहाँ गुरुवारी रथयात्रेत सहभागी होणार

कोलकाता येथील इस्कॉनचे विशेष पाहुण्या म्हणून निमंत्रण

तृणमूल काँग्रेसच्या नवनिर्वाचित खासदार व अभिनेत्री नुसरत जहाँ यांना कोलकाता येथील इस्कॉन रथयात्रेच्या विशेष पाहुण्या म्हणून निमंत्रित करण्यात आले  आहे. इस्कॉनच्या सामाजिक सलोख्याच्या भूमिकेशी नुसरत जहाँ यांची भूमिका जुळणारी असल्याचे सांगून इस्कॉनने त्यांना निमंत्रण पाठवले होते ते नुसरत जहाँ यांनी स्वीकारले आहे. ही रथयात्रा गुरुवारी होणार आहे.

जहाँ यांनी निमंत्रण स्वीकारल्याबाबत त्यांना आम्ही धन्यवाद देतो, असे इस्कॉनचे प्रवक्ते राधारमण दास यांनी म्हटले आहे. नुसरत जहाँ यांनी सर्वसमावेशक भारताचे प्रतिनिधित्व त्यांच्या भूमिकेतून केले असून त्यांनी पुढचा मार्ग दाखवला आहे, असे त्यांनी सांगितले.

इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्ण कॉन्शसनेस या संस्थेच्या वतीने १९७१ पासून रथयात्रेचे आयोजन केले जाते. या वेळी ४८ व्या रथयात्रेसाठी नुसरत जहाँ यांना निमंत्रण देण्यात आले आहे. या रथयात्रेचे उद्घाटन मुख्यमंत्री ममता बॅनर्जी करणार आहेत. कोलकाता येथील जैन उद्योगपतीशी नुसरत जहाँ यांचा नुकताच विवाह झाला असून संसदेत शपथविधीसाठी येताना त्यांनी कुंकू लावून मंगळसूत्र घातल्याने त्यांच्यावर समाजमाध्यमातून टीका झाली होती. सर्वसमावेशी भारत हा जात, वंश व धर्माच्या पलीकडे आहे असे नुसरत यांनी टीकेला उत्तर देताना म्हटले होते. त्यांच्याविरोधात मुस्लीम धर्मगुरूंनी फतवाही जारी केला होता.

इस्कॉनचे प्रवक्ते दास यांनी सांगितले,की नुसरत जहाँ या नवभारताच्या खऱ्या प्रतिनिधी आहेत. सर्व धर्माविषयी आदर व एकमेकांच्या सणात सहभाग यातूनच भारत मोठा होईल. नुसरत जहाँ यांच्यासारख्या तरुणी पुढचा मार्ग दाखवित आहेत. देवाने सर्वानाच स्वातंत्र्य दिले आहे. ते कुणीही हिरावून घेऊ नये.

नुसरत जहाँ यांनी रथयात्रेच्या आयोजनाबाबत इस्कॉनचे अभिनंदन केले असून शहरातील सर्व लोकांनी या रथयात्रेत सहभागी व्हावे असे आवाहन केले आहे. रथयात्रेला लाखो भक्तगण उपस्थित राहण्याची अपेक्षा असून यात जगन्नाथ, बलराम व सुभद्रा यांची प्रतिमा असलेले रथ ओढले जातात. हंगरफोर्ड स्ट्रीट येथून रथयात्रा सुरू होणार असून ती ब्रिगेड परेड ग्राउंडकडे जाईल. १२ जुलैला रथ अल्बर्ट रोड मंदिरात परत जातील.

इस्कॉनच्या सामाजिक सलोख्याच्या भूमिकेशी नुसरत जहाँ यांची भूमिका जुळणारी असल्याने इस्कॉनने त्यांना निमंत्रण पाठवले होते. ते त्यांनी स्वीकारले आहे.     – राधारमण दास, इस्कॉनचे प्रवक्ते 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button