breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

‘नीट’ नेटकीच, पण प्रश्नही अनेक!

  • प्रवेशपरीक्षांबाबत आणखी स्पष्टता आवश्यक

मुंबई : वैद्यकीय आणि अभियांत्रिकी प्रवेशपरीक्षा दोन वेळा होणार असल्याने विद्यार्थ्यांना अतिरिक्त संधी मिळणार असल्याने या निर्णयाचे तज्ज्ञ, विद्यार्थी, पालक, शिक्षक यांनी स्वागत केले आहे. मात्र, ‘नीट’ची परीक्षा आणि राज्य मंडळाची परीक्षा दोन्ही फेब्रुवारी महिन्यात होणार असल्यामुळे विद्यार्थ्यांचा गोंधळ उडण्याची शक्यता आहे. तसेच वेगवेगळ्या घेण्यात आलेल्या परीक्षांच्या गुणांचे समानीकरण कसे होणार, ऑनलाइन परीक्षांसाठी आवश्यक पायाभूत सुविधा आहेत का? प्रत्येक परीक्षेसाठी कठिण्यपातळी समान राखली जाणार का? असे प्रश्नही उपस्थित करण्यात येत आहेत.

गेल्या काही वर्षांत वैद्यकीय आणि अभियांत्रिकीच्या प्रवेशासाठी निर्णायक ठरणाऱ्या संयुक्त प्रवेश परीक्षा (जेईई) आणि राष्ट्रीय पात्रता परीक्षा (नीट) या दोन्हींबाबत विद्यार्थ्यांची फरफट सुरू होती. देशभरातून होणाऱ्या या परीक्षांपैकी ‘नीट’ने तर विद्यार्थी आणि पालकांच्या तणावात प्रचंड भर घातली. ड्रेसकोडपासून परीक्षांच्या क्रमांक चुकांपर्यंत, केंद्राबाबत चुकीचा तपशील जाहीर करण्यापासून ते दोन-तीन मिनिटे उशिरा पोहोचल्यामुळे परीक्षेला मुकाव्या लागलेल्या विद्यार्थ्यांचे वर्षच वाया जाणे, असे अनेक प्रकार राज्याराज्यांत घडत होते.

‘नीट’ आणि इतर सामाईक परीक्षांमुळे न्यायालय आणि राजकीय पातळीवर घुसळण होत असल्यामुळे या परीक्षांना सुनियोजित दर्जा देण्याची होती. आता ‘जेईई’ आणि ‘नीट’ या दोन्ही परीक्षा वर्षांतून दोनदा घेण्यासोबतच सर्व राष्ट्रीय परीक्षा एकाच संस्थेच्या अखत्यारीत आणण्याचा निर्णय घेण्यात आल्यामुळे देशभरातील विद्यार्थी आणि पालकांचा या परीक्षांबाबतचा तणाव काही प्रमाणात कमी होणार आहे.

परीक्षा अशा..

* ‘जेईई’साठी विद्यार्थ्यांची पहिली परीक्षा जानेवारी महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवडय़ात होणे अपेक्षित आहे. त्यासाठी १ ते ३० सप्टेंबपर्यंत विद्यार्थी ऑनलाइन अर्ज भरू शकतात. या परीक्षेचा निकाल फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवडय़ात लागेल. ‘जेईई’साठी दुसरी परीक्षा ७ ते २१ एप्रिलच्या दरम्यान होईल. विद्यार्थी दुसऱ्या आठवडय़ात म्हणजेच पहिल्या परीक्षेच्या निकालानंतर लगेचच अर्ज भरू शकतात. या दोन्ही परीक्षा आठ बैठकींत चार ते पाच दिवस चालतील. विद्यार्थ्यांना आपल्या पसंतीनुसार वेळ आणि तारीख निवडता येईल.

* ‘नीट’ची पहिली परीक्षा फेब्रुवारी महिन्यात होईल. १ ते ३१ ऑक्टोबर या काळात याचे अर्ज विद्यार्थ्यांना ऑनलाइन भरता येतील. परीक्षा ३ ते १७ फेब्रुवारी या काळात होईल. ही परीक्षाही आठ बैठकींत चार ते पाच दिवस विद्यार्थ्यांनी निवडलेल्या दिवसांत होईल. त्याचा निकाल मार्च महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात लागेल. त्यानंतर मे महिन्यात होणाऱ्या परीक्षेसाठी विद्यार्थी अर्ज करू शकतील. १२ ते २६ मे या कालावधीत दुसरी ‘नीट’ परीक्षा होईल. त्याचा निकाल जूनच्या पहिल्या आठवडय़ात लागेल.

* व्यवस्थापन अभ्यासक्रमाची ‘सीमॅट’ आणि औषधनिर्माण पदवी कलचाचणी म्हणजेच ‘जीपॅट’ची परीक्षा २७ जानेवारीला होणार असून २२ ऑक्टोबर ते १५ डिसेंबर त्याचा अर्ज स्वीकारला जाईल. या सर्व परीक्षा राष्ट्रीय परीक्षा संस्थेद्वारे घेतल्या जाणार असल्यामुळे नियम आणि त्यांच्या अंमलबजावणीत सुसूत्रता असेल.

या गोष्टी महत्त्वाच्या..

* आपल्याकडे ऑनलाइन परीक्षा सुरळीत होण्यासाठी आवश्यक त्या पायाभूत सुविधा उभ्या कराव्या लागतील. पायाभूत सुविधांची गरज आणि उपलब्धता लक्षात घेता केंद्रे किती आणि कुठे असतील याबाबत अद्याप संभ्रम आहे.

* ऑनलाइन परीक्षा पहिल्या टप्प्यात आठवेळा तर दुसऱ्या टप्प्यात ८ बैठकीत होणार आहे. या प्रत्येक परीक्षेची काठीण्य पातळी समान

राहील याची काळजी घेणे आवश्यक आहे.

* ‘नीट’ची पहिली परीक्षा फेब्रुवारीमध्ये होईल. त्याच वेळी बारावीच्याही परीक्षा सुरू होतात. त्यामुळे या दोहोंचे वेळापत्रक जुळवावे लागेल.

* सध्या मुलांना परीक्षेसाठी तीन संधी दिल्या जातात. त्या पुढे कशा असतील याबाबत अद्याप तरी स्पष्टता नाही.

परिणाम काय?

* विद्यार्थ्यांना एकाच वर्षांत दोनदा संधी मिळणार असल्यामुळे त्यांचे वर्ष वाचू शकेल. पहिल्या परीक्षेत आलेल्या अपयशाला दुसऱ्या परीक्षेत धुवून काढता येणे शक्य असेल.

* मात्र पहिल्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना तीन महिने कमी मिळणार असल्याने त्यांनी अभ्यासाचे व्यवस्थित नियोजन करणे आणि गती वाढवणे गरजेचे आहे.

* परीक्षा ऑनलाइन घेण्यात येणार असल्यामुळे त्यात गैरप्रकारांची शक्यता नसेल.

विद्यार्थ्यांना या निर्णयाचा नक्कीच फायदा होईल. आत्ताच्या परीक्षा पद्धतीत मुले वर्षभर ‘जेईई’ची तयारी करतात. पण मध्येच त्यांना बारावीच्या परीक्षेची तयारी करावी लागते. या दोन्ही परीक्षांमध्ये खूप फरक आहे. त्यामुळे मुले एप्रिलमध्ये ‘जेईई’ देतात तेव्हा त्यांच्या गुणांत नक्कीच फरक पडतो. मात्र, आता परीक्षा जानेवारी महिन्यातच होणार असल्यामुळे मुलांना दोन्ही परीक्षांकडे नीट लक्ष देणे शक्य होईल. मात्र होणाऱ्या सगळ्या परीक्षांची काठिण्यपातळी समान असणे आवश्यक आहे. त्यासाठी परीक्षा मंडळाने कोणत्या विषयासाठी किती गुणभार असेल, हे सांगणे आवश्यक आहे.

– दुर्गेश मंगेशकर, ‘जेईई’, ‘नीट’ परीक्षांचे मार्गदर्शक

निर्णयाचे स्वागतच करायला हवे. मात्र, या परीक्षांचे व्यवस्थापन काटेकोर असायला हवे. ‘नीट’ची परीक्षा फेब्रुवारीत होत असल्यामुळे मुलांचा गोंधळ उडण्याची शक्यता आहे.

– दिलीप शहा, ‘नीट’ परीक्षेचे मार्गदर्शक

दोन संधी मिळत असल्यामुळे परीक्षेत ऐनवेळी झालेल्या चुका सुधारता येणार आहेत. त्यामुळे हा निर्णय स्वागतार्हच आहे. परंतु मे महिन्यात परीक्षा होणार असे गृहीत धरून तयारी करण्याकडे विद्यार्थ्यांचा कल आहे. फेब्रुवारीमध्ये मुले बोर्डाच्या परीक्षेच्या तयारीत राहतील. पण आता फेब्रुवारीत होणारी पहिली परीक्षा हीच अंतिम परीक्षा समजून मुलांनी तयारी करायला हवी. त्यासाठी जानेवारीपर्यंत अभ्यासक्रम संपवावा आणि सरकारतर्फे उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या संगणक केंद्रावर सराव चाचण्या द्याव्यात.

– डॉ. अतुल ढाकणे

पहिल्या परीक्षेतील चुका सुधारण्याची संधी मुलांना मिळेल. अजून एक संधी मिळणार आहे असे वाटले की त्यांचा ताण थोडा कमी होईल. परीक्षा लवकर होणार असल्याने मुलांना उन्हाळी सुट्टीचा आनंद घेता येईल.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button