breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

निवडणूक मावळची, मुद्दा काश्मीरचा, मुख्यमंत्री उत्तर प्रदेशचा.

पिंपरी महाईन्यूज – 

महाराष्ट्रातील  शेतकरी आत्महत्या, तरुणांचा रोजगार, माता भगिनींच्या सुरक्षिततेचा प्रश्न असेल, या सगळ्या समस्यांबाबतीत भाजप सरकार नापास झाले आहे. निवडणुकीसाठी भाजप सरकारकडे आता कोणतेच मुद्दे शिल्लक नाहीत. निवडणूक मावळची, मुद्दा काश्मीरचा, मुख्यमंत्री उत्तर प्रदेशचा..ही अशी निवडणूक असती होय? असा तडाखेबंद सवाल शिरूरचे खासदार, राष्ट्रवादी  काँग्रेसचे स्टार प्रचारक डॉ. अमोल कोल्हे यांनी मंगळवारी लोणावळ्यात केला.  मावळ विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस (आय), स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष आणि मित्रपक्ष महाआघाडीचे उमेदवार सुनील शेळके यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. 
यावेळी राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकनकर, माजी आमदार कृष्णराव भेगडे, माजी मंत्री मदन बाफना, राष्ट्रवादी काँग्रेस पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, ज्येष्ठ नेते माउली दाभाडे, राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष बबनराव भेगडे व काँग्रेस तालुका अध्यक्ष बाळासाहेब ढोरे, चंद्रकांत सातकर, मावळ तालुका अध्यक्ष बबनराव भेगडे उपस्थित होते. 

खा. डॉ. अमोल कोल्हे यांना सभास्थळी येण्यास उशीर झाल्याबद्दल त्यांनी दिलगिरी व्यक्त करताना तिरकस टीका केली. मावळच्या रस्त्यावर ४०० कोटी खर्च झाले असते तर मी अर्धा तास लवकर आलो असतो, असे ते म्हणाले. ही निवडणूक महाराष्ट्राच्या भविष्याची निवडणूक आहे. आता मात्र सुनील अण्णांशिवाय पर्याय नाही. ज्यांना भिडण्यासाठी दोन-दोन मुख्यमंत्री येतात. ३७० कलम रद्द झाला म्हणून इथल्या समस्या संपल्या का? असा प्रश्न कोल्हे यांनी केला महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्या,तरुणांचा रोजगार, माता भगिनींच्या सुरक्षिततेचा प्रश्न असेल, सगळ्याबाबतीत हे सरकार नापास झालं आहे. मध्यंतरी भाजपचा अजगर झाला होता. ईडी, सीबीआय, असे फुत्कार टाकून राष्ट्रवादीची माणसे गिळणाऱ्या या अजगरावर ७९ वर्षाच्या शरद पवार नावाच्या तरुणाने वर्मी घाव घातला. मावळला आमदार हवा आहे, मंत्री नको. ३ सप्टेंबरच्या बैठकीत निर्णय घेतला. गड -किल्ले पर्यटनासाठी भाड्याने देण्याचा निर्णय दिला. तेव्हा आपण मंत्री मंडळात मान खाली घालून घातला ? तुम्हाला मावळचा स्वाभिमान दिसला नाही का? उडत गेलं मंत्रिपद असं का नाही बोलले? तुम्ही मावळवासीयांकडे मत मागायचा अधिकार गमावलाय, अशी घणाघाती टीका डॉ. कोल्हे यांनी विरोधकांवर केली. 

राष्ट्रवादीचे उमेदवार सुनील शेळके म्हणाले कि, जनतेच्या ताकदीवरती विश्वास ठेवूनच मला राष्ट्रवादीने उमेदवारी दिली.  मी आजपर्यंत कुठल्याच पक्षावर टीका केली नाही. निवडणूक विचारांची लढाई व्हायला पाहिजे. प्रत्येकाला मत मांडण्याची मुभा आहे. मी जसा आहे, तसा जनतेने स्वीकारला आहे. विरोधक आणि मी एकाच तालमीतले आहोत. भाजपचे राजकारण खालच्या थराचे आहे. गरिबांना नाडले जाते. मी ८ वर्षांपासून तळेगाव नगरपरिषदेत काम करतोय, त्यामुळे किती पैसे आले, किती दाखवले गेले, किती पैशांचे काम झाले, हे सगळे माहितेय. जनतेची किती दिशाभूल करायची? महिलांची २ लाखांच्या पॉलिसी काढण्याच्या नावाखाली फसवणूक केली. विरोधकांना उद्देशून ते म्हणाले कि, तुम्ही १४०० कोटी रुपयांची कामे केली असतील तर ते कुठे गेले? मला पाडण्यासाठी दोन-दोन मुख्यमंत्र्यांना का आणावे लागले ? मावळवासियांनो, फक्त एक संधी द्या. मला मान नको, सन्मान नको. फक्त शाबासकीची थाप द्या, असे भावनिक आवाहन शेळके यांनी केले. 

संत तुकाराम साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे  यांनी आपल्या मनोगतात मावळ तालुक्यातील समस्यांचा आढावा घेऊन भाजप सरकारच्या कारभारावर ताशेरे ओढले. २५ वर्षे मावळवासीयांनी आपला वेळ वाया घालवला आहे. लोणावळा हे पर्यटन स्थळ आहे. मात्र तिथे पर्यटकांची सुरक्षितता राखली जाते का? महिला पर्यटक असुरक्षित आहेत. आरोग्याच्या असुविधा, रस्त्यांची दुरवस्था, महामार्गावरील अपघात, याला कोण जबाबदार आहे? मुख्यमंत्री दिशाभूल करतात. त्यामुळे येत्या निवडणुकीत त्यांची जागा दाखवून द्या. 

चौकट भाजप-शिवसेनेचं दिवाळं काढल्याशिवाय दिवाळी साजरी करायची नाही ! शिरूरचे खासदार, राष्ट्रवादी  काँग्रेसचे स्टार प्रचारक डॉ. अमोल कोल्हे यांनी भाजप सरकारवर कडाडून टीका केली. मावळातून तसेच शेजारच्या पिंपरी-चिंचवडमधून कमळाची पाकळी ठेवायची नाही, असा निश्चय आपण सर्वांनी करूया. मतदानानंतर लगेच दिवाळी सुरु होणार आहे. देशातील तसेच राज्यातील समस्या संपवण्यात अपयशी ठरलेल्या भाजप-शिवसेना सरकारचं दिवाळं काढल्याशिवाय यंदाची दिवाळी साजरी करायची नाही, असे आवाहन डॉ. कोल्हे यांनी मावळवासीयांना केले.  

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button