breaking-newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्र

नमस्कार…मी महावितरणमधून बोलतोय…वीज बील भरले आहे का?

– प्रशासनाचे ग्राहकांना आवाहन : सहकार्य करा, वीजबिल भरा !

कोल्हापूर । महाईन्यूज ।प्रतिनिधी

 ‘नमस्कार… मी महावितरणमधून बोलतोय आपण आपले वीजबिल भरले आहे का ? नसेल भरले तर कृपया लवकर भरा…’ असे विनम्र आवाहन करणारे फोन सध्या वीजग्राहकांना येत आहेत. मात्र आपण या फोनची वाट न पाहता एक जबाबदार नागरिक व वीजग्राहक म्हणून आपले बिल नजीकच्या वीजबिल भरणा केंद्रात किंवा ऑनलाईन भरुन सहकार्य करावे असे विनम्र आवाहन महावितरणचे कर्मचारी सध्या करीत आहेत.

गेल्या अडीच महिन्यांपासून लॉकडाऊनमुळे वसूली ठप्प झाल्याने महावितरणसह इतर वीज कंपन्या आर्थिक संकटात आल्या आहेत. इतकंच नाही तर हा उद्योग वाचविण्यासाठी वीज कंपन्यांना तब्बल 20 हजार कोटींच कर्ज घ्यावे लागत आहे. कोरोना संसर्ग टाळण्यासाठी लॉकडाऊनच्या काळात अधिकृत वीजबिल भरणा केंद्रे बंद ठेवावी लागल्याने ग्राहकांना ऑनलाईन वीजबिल भरण्याचे आवाहन करण्यात आले. मात्र कोल्हापूरसह सांगलीतील केवळ 10.32 टक्के ग्राहकांनीच त्याला प्रतिसाद दिला. या दोन जिल्ह्यात मागील 90 दिवसांपासून 1 रुपया देखील वीजबिल न भरणाऱ्या घरगुती, वाणिज्यिक व लघुदाब औद्योगिक ग्राहकांची संख्या 4 लाख पाच हजार असून त्यांच्याकडे 71 कोटी थकले आहेत. तर याच वर्गवारीत 300 रुपयांहून अधिक थकबाकी असणाऱ्या 10 लाख ग्राहकांकडे तब्बल 189 कोटी रुपये थकबाकी आहे.

एकीकडे लॉकडाऊनच्या काळात जनता घरात अडकून होती. या काळात घरगुती ग्राहकांचा वीजवापर वाढला. त्या सर्वांना अखंडित वीजपुरवठा केल्याने लॉकडाऊन यशस्वी करण्यात महावितरणने मोलाचे योगदान दिले. दुसरीकडे मात्र, कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मा. आयोगाच्या व शासनाच्या आदेशानुसार महावितरणला मार्च, एप्रिल व मे या तीन महिन्याचे मीटर रिडींग घेता आले नाही. परिणामी ग्राहकांना मागील वापराच्या तीन महिन्यांच्या सरासरीने बिलींग करावे लागले. ही बिले छापण्यावर व वाटपावर देखील बंधने आल्याने ग्राहकांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर वीज देयकाचे संदेश (SMS) पाठविण्यात आले. त्याधारे ग्राहकांनी वीजबिल भरणा करणे अपेक्षित होते. मात्र तो मिळाला नसल्याने लॉकडाऊन शिथील होताच महावितरणने कंटेनमेंट झोन वगळून सर्व अधिकृत वीजबिल भरणा केंद्रे सुरु केली आहेत.

अफवांवर विश्वास ठेवू नये- महावितरण

जून महिन्यापासून वीजमिटरचे रिडींग घेण्यास सुरुवात झाली असून, येणारी बिले ही चालू रिडींगनुसार येणार आहेत. तत्पूर्वी ग्राहकांनी मागील दोन देयके भरुन घ्यावीत. एप्रिल व मे महिन्यात कडक उन्हाळामुळे घरातील उपकरणांचा वापर वाढल्याने सरासरीने कमी गेलेल्या बिलाची तफावत येणाऱ्या बिलामध्ये दिली जाईल. त्यामुळे प्रथमदर्शनी आलेले बील जादा वाटणाऱ्या ग्राहकांनी आपल्या मीटरवरील वापर तपासावा व वीजबिल भरावे. वीजबिलाबाबतच्या कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. अधिक माहितीसाठी महावितरणच्या मोबाईल ॲपचा वापर करावा किंवा www.mahadiscom.in या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button