breaking-newsपुणे

धोकादायक डासांच्या प्रजाती ओळखणाऱ्या उपकरणाची निर्मिती

आर्मी इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांचे संशोधन

डेंग्यू, मलेरिया, चिकुनगुन्या, पिवळा ताप अशा डासांच्या माध्यमातून पसरणाऱ्या साथींचा प्रादुर्भाव हे जगातील अनेक देशांवरील सर्वात भीषण संकट असल्याचा इशारा जागतिक आरोग्य संघटनेकडून दिला जातो. हे आजार डासांच्या माध्यमातून पसरतात. मात्र या साथी पसरवणारे डास ओळखण्याचे तंत्र अद्याप उपलब्ध नाही. यावर उपाय शोधण्यासाठी आर्मी इन्स्टिटय़ूटच्या निधी यादव आणि सौरभ या विद्यार्थ्यांनी पुढाकार घेऊन ‘मॉस्किटो डिटेक्टर – काउंटर अ‍ॅण्ड अलर्टर’ची निर्मिती केली आहे.

निधी यादव आणि सौरभ हे विद्यार्थी आर्मी इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये इलेक्ट्रॉनिक आणि टेलिकम्युनिकेशनच्या दुसऱ्या वर्षांला शिकतात. टाटा ग्रँड आयओटी या स्पर्धेसाठी त्यांनी हे संशोधन केले. निधी यादव म्हणाली, आफ्रिकेतील एका जमातीला डासांच्या रंग, आकार, शरीररचना यांवरून धोकादायक प्रजाती ओळखण्याचे ज्ञान अवगत असल्याचे आमच्या वाचनात आले. त्या वेळी डासांबाबत जगभरात सुरू असलेल्या संशोधनाबाबत अभ्यास सुरू केला. स्टॅनफोर्ड आणि हार्वर्ड विद्यापीठातील संशोधन सोडल्यास इतरत्र डासांबाबत संशोधन होत नाही. डासांच्या पंखांच्या हालचालींच्या (विंग बीट फ्रिक्वेन्सी) आवाजाचा वेध घेऊन त्यांच्या प्रजाती ओळखण्यासाठी आम्ही प्रयत्न सुरू केले. यासाठी स्टॅनफोर्ड विद्यापीठातील मोठा ‘डेटाबेस’ वापरण्याची संधी आम्हाला मिळाली. उपकरणाकडे डास आकृष्ट झाल्यानंतर त्यांच्या पंखांच्या हालचाली टिपण्यासाठी अतिउच्च क्षमतेचे मायक्रोफोन वापरण्यात आले आहेत.

भारतात डेंग्यू, मलेरिया, चिकुनगुन्या, पिवळा ताप पसरवण्यास कारणीभूत ठरणाऱ्या एडिस, अ‍ॅनाफोलिस, क्युलेक्स या तीन प्रजातींबाबत आम्ही संशोधन केले. या संशोधनासाठी टाटा ग्रँड आयओटी स्पर्धेत द्वितीय क्रमांक तसेच अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद, इंजिनिअरिंग कौन्सिल ऑफ इंडिया आणि इंडियन सोसायटी फॉर टेक्निकल एज्युकेशन तर्फे छात्र विश्वकर्मा पुरस्कार मिळाल्याचेही तिने सांगितले.

सौरभ म्हणाला, साथीचा आजार पसरवणारा डास ओळखण्यासाठी ‘मॉस्किटो डिटेक्टर – काउंटर अ‍ॅण्ड अलर्टर’ हे उपकरण उपयुक्त ठरणार आहे. त्या त्या परिसरातील डासांच्या धोकादायक प्रजातींचे प्रमाण दिसताच परिसरातील व्यक्तींना संदेश पाठवण्याची सोय यात आहे. त्यानुसार कोणत्या प्रकारचे औषध फवारून प्रतिबंध करता येईल याची माहिती नागरिकांना देण्यात येणार आहे. साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव थांबवून अनेक नागरिकांचा धोका दूर करणे त्यामुळे शक्य होणार आहे. या उपकरणाचे पेटंट मिळवण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. त्यानंतर याचे मोठय़ा प्रमाणावर उत्पादन करण्यास उद्योजक पुढे आले असता समाजाला त्याचा उपयोग होईल.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button