breaking-newsपुणेमहाराष्ट्र

‘रमी खेळा, पैसे जिंका’; हा फसवणुकीचा डाव!

पैशांच्या लालसेपोटी तासनतास खेळ

गेल्या काही दिवसांपासून ऑनलाइन ‘रमी खेळा, पैसे जिंका’अशा प्रकारचे संदेश प्रसारित होत आहेत. मोबाइलवर रमी खेळणाऱ्या अनेक जणांचा तासनतास वेळ त्यात खर्ची पाडत आहे. या खेळात पैसे दिले जात नाहीत. फक्त पॉइंट्स दिले जातात. अशा प्रकारचे पॉइंट्स मिळवण्याच्या नादात मोठय़ा संख्येने तरुणाई त्यांच्या अभ्यासाचा वेळ ऑनलाइन खेळात व्यर्थ घालवत आहे.

पैसे मिळण्याच्या आशेने अनेक जण सध्या ‘रमी खेळा, पैसे जिंका’ हा खेळ मोबाइलवर खेळत आहेत. तासन तास मोबाइलवर हा खेळ खेळला जात असल्याने अनेकांना तरुण वयात मानदुखीचा त्रास जाणवू  लागला आहे. काहींच्या डोळ्यांवर देखील परिणाम झाला आहे. एवढेच नव्हे तर तासनतास मोबाइलवर खेळ खेळल्याने तरुणांच्या बोटांच्या संवेदना बोथट होत चालल्या आहेत, असे निरीक्षण पुणे पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेतील अधिकाऱ्यांकडून नोंदवण्यात आले.

ब्ल्यू व्हेल, पबजी किंवा रमी खेळा आणि पैसे जिंका अशा प्रकारचे खेळ व्यक्तीला आभासी विश्वात घेऊन जातात. अशा प्रकारांच्या खेळात तरुण किंवा शालेय विद्यार्थी गर्क असतात. आभासी विश्वातील अनेक गोष्टी त्यांना प्रत्यक्षात असल्याचा भास होतो. त्यातून काही दुर्घटना घडल्या आहेत. शाळकरी मुले घरातून बेपत्ता होणे तसेच आत्महत्या अशा घटना घडल्या होत्या. त्यामुळे पालकांनी शक्यतो शाळकरी मुलांना मोबाइल वापरास दिल्यास ते मोबाइलवर काय करतात, यावर बारकाईने लक्ष ठेवणे गरजेचे आहे. मोबाइलमुळे मुलांचा वेळ खर्ची पडतो तसेच अभ्यासाकडे दुर्लक्ष होते, असे सायबर गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक जयराम पायगुडे यांनी नमूद केले. गेल्या काही दिवसांपासून ‘रमी खेळा, पैसे जिंका’अशा प्रकारचे संदेश किंवा िलक मोबाइलवर येत आहेत. अशा लिंककडे दुर्लक्ष करावे. कारण अशा प्रकारच्या खेळात पैसे दिले जात नाहीत आणि पॉइंट्स कमाविण्याच्या नादात अनेक जण तासन तास मोबाइलवर वेळ घालवितात. अशा प्रकारच्या खेळात फसवणूक झाल्याच्या तक्रारी आल्या आहेत.

पबजी किंवा अन्य मोबाइल खेळांमुळे मुलांचे शैक्षणिक नुकसान होते. पालकांनी मुलांवर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. शाळकरी मुलांना खेळण्यासाठी मोबाइल देण्यापेक्षा त्यांना मैदानी खेळांसाठी पाठवणे अधिक मुलांसाठी आवश्यक आहे. त्यामुळे शारीरिक तंदुरुस्ती मिळेल तसेच अभ्यासावर लक्ष केंद्रित होईल.

– जयराम पायगुडे, पोलीस निरीक्षक, सायबर गुन्हे शाखा, पुणे पोलीस

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button