breaking-newsपुणेमहाराष्ट्र

‘धरणफुटीने संकटावर मात करण्याचे धैर्य दिले’

कोणी कामावर तर, कोणी शाळेमध्ये गेलेले असताना अचानक दुपारी घरी परतावे लागले. सकाळी नदीला पाणी नव्हते. पण, दुपारनंतर नदी केवळ दुथडी भरून वाहू लागली नाही तर, अनेकांचे संसार उद्ध्वस्त करून गेली. धरण फुटले हे ठाऊकच नव्हते. आम्हाला वाटत होते केवळ नदीला पूर आला आहे. मात्र, या घटनेने आम्हाला संकटावर मात करण्याचे धैर्य दिले.. पानशेत धरणफुटीने बाधित कुटुंबातील सदस्यांनी ५८ वर्षांपूर्वीच्या आठवणी गुरुवारी जागविल्या.

१२ जुलै १९६१ रोजी पानशेत धरण फुटले आणि असंख्य कुटुंबांची वाताहत झाली त्या घटनेला शुक्रवारी ५८ वर्षे पूर्ण होत आहेत. शनिवार पेठेमध्ये नदीकाठी वास्तव्याला असलेल्या अनेक कुटुंबांना पुराचा तडाखा बसला. नेने घाट परिसरातील लक्ष्मण परळीकर आणि प्रकाश आठवले यांनी या घटनेच्या स्मृती अजून जपल्या आहेत. पानशेत पुरानंतर आमच्या आयुष्याला कलाटणी मिळाल्याची भावना या दोघांनी व्यक्त केली.

तेव्हा २६ वर्षांचा असलेला मी किलरेस्कर ऑईल इंजिनमध्ये कामाला होतो. कामावर गेल्यानंतर थोडय़ा वेळाने घरी पाठविण्यात आले. एप्रिलमध्ये माझा विवाह झाला होता आणि विवाहानंतर तीन महिन्यातच पुराची घटना घडली. नव्या नवरीचा संसार डोक्यावर घेऊन जाण्याची वेळ पत्नीवर आली, असे ८५ वर्षांच्या लक्ष्मण परळीकर यांनी सांगितले. मी पट्टीचा पोहणारा असल्यामुळे त्यावेळी पुराच्या पाण्यामध्ये वाहून जात असलेल्या काहींचे प्राण वाचवू शकलो. त्यापैकी एक बाळकृष्ण करंबेळकर यांनी त्यांच्या षष्टय़ब्दीपूर्तीला माझा सत्कार केला होता आणि मी केवळ तुमच्यामुळे जिवंत असल्याची कृतज्ञता व्यक्त केली होती, असेही परळीकर यांनी सांगितले.

पानशेत धरण फुटल्यानंतर नदीकाठचे मातीचे घर वाहून गेले. आमचे एकत्र कुटुंब होते. मी रमणबाग प्रशालेत सातवीत होतो. १२ जुलै रोजी दिव्याची अमावस्या होती. मी आणि धाकटा भाऊ उल्हास, आम्ही जेवण करून शाळेला गेलो होतो. ‘धरण फुटलंय, आता पाणी येईल’, असे मोठी माणसे बोलताना ऐकले होते. माझी मोठी बहीण प्रभावती आम्हाला घरी नेण्यासाठी शाळेमध्ये आली होती, अशी आठवण ७० वर्षांच्या प्रकाश आठवले यांनी सांगितली.

देशमुखवाडीतील आंबेकर यांच्याकडे आणि नंतर लक्ष्मण भुवन कार्यालयाचे मालक महाजन यांच्याकडे काही काळ आमच्या कुटुंबाचे वास्तव्य होते. अनेकांची घरे आणि घरातील साहित्य पुराच्या पाण्याबरोबर वाहून गेले. आमच्या मुंजीमध्ये जादुगार रघुवीर पोफळे यांनी आहेर म्हणून दिलेले भांडय़ांचे खोके पुराच्या पाण्याबरोबर वाहून गेले. मात्र, खोक्यातील भांडय़ांवर ‘जादुगार रघुवीर यांच्याकडून सप्रेम भेट’, असे नाव वाचल्यानंतर ही भांडी परत मिळाली अशी आठवणही प्रकाश आठवले यांनी सांगितली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button