breaking-newsताज्या घडामोडीपुणे

देशी गुलाबापासून वाइन! मायलेकींच्या प्रयोगाला यश

पुणे – फळांपासून बनलेल्या वाइनची चव अनेकांनी नक्कीच चाखली असेल. परंतु, लवकरच वाइनप्रेमी चक्क गुलाबापासून बनलेल्या वाइनचाही आस्वाद घेऊ शकतील. पुणेकर मायलेकींनी गुलाबापासून वाइन तयार करण्याचे तंत्र विकसित केले असून, त्याचे पेटंटही मिळवले आहे. येत्या काही महिन्यांत या वाइनचे व्यावसायिक उत्पादन सुरू होईल.

पुण्यातल्या जयश्री यादव व त्यांची मुलगी कश्मिरा यादव-भोसले यांनी हे तंत्र विकसित केले आहे. ‘सध्या बाजारात गुलाबाचा अर्क घातलेली वाइन उपलब्ध आहे. त्याला गुलाबाचा स्वाद असला, तरी मूळ द्राक्ष्यापासूनच बनलेली असते. आम्ही विकसित केलेली वाइन ही पूर्णपणे देशी गुलाबापासून बनवलेली आहे. अशा प्रकारची ही पहिलीच वाइन असल्याने आम्हाला त्यासाठीचे पेटंट मिळाले आहे,’ असे जयश्री यांनी सांगितले.

‘मी २००१पासून गुलकंद, सरबत आणि गुलाबजल तयार करते. सुरुवातीला मी शेतकऱ्यांकडून गुलाब विकत घ्यायचे. अलिकडेच मी स्वतःच गुलाबाची शेती सुरू केली. गुलकंदासाठी गुलाबाच्या पाकळ्या वेगळ्या काढताना त्याचा सुगंध आणि स्वाद, तसेच गुलाबाचे औषधी गुणधर्म यामुळे आपण यापासून वाइन बनवून पाहावी असा विचार माझ्या डोक्यात आला आणि तसे प्रयत्न सुरू केले,’ असे जयश्री म्हणाल्या.

‘गुलाबापासून वाइन तयार करण्याच्या प्रक्रियेबाबत मी २००९पासून काम करत होते. तेव्हाही मी यासाठी पेटंट मिळविण्यासाठी अर्ज केला. पण ती प्रक्रिया पूर्ण झाली नाही. दरम्यान, माझी मुलगी कश्मिरा हिने ऑस्ट्रेलियातील मेलबर्न येथून वाइन निर्मितीचे खास प्रशिक्षण घेतले. त्यानंतर भारतातही यातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेतले. काही प्रयोग करून आम्ही ही गुलाब वाइन विकसित केली. चाकण एमआयडीसीतील वराळे येथे प्रकल्प उभारण्याची परवानगी आम्ही घेतली आहे. लवकरच तिथे प्रकल्प उभारण्याचे काम सुरू होईल. साधारण सहा-सात महिन्यांत इथून प्रत्यक्ष उत्पादन सुरू होईल,’ असे जयश्री यांनी नमूद केले.

कायद्यात सुधारणेनंतर मिळाले पेटंट

गुलाबापासून वाइन निर्मितीच्या तंत्राचे पेटंट घेण्यासाठी २०१३-१४ पासून जयश्री यांनी पुन्हा प्रयत्न सुरू केले. २०१७ पर्यंत फक्त फळांपासूनच वाइन तयार करण्याची परवानगी होती. त्यामुळे राज्य सरकारला विनंती केल्यानंतर या संदर्भातील कायद्यात सुधारणा करण्यात आली. त्यानंतर काही महिन्यांपूर्वी जयश्री यांना यासाठीचे पेटंट मिळाले. पेटंटच्या प्रक्रियेत रश्मी गणेश हिंगमिरे यांनी त्यांना साह्य केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button