breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

दुष्काळी भागाचे पाणी पुन्हा बारामतीला वळविले; मंत्रीमंडळ बैठकीत मंजूरी

बारामतीचे जून २०१९ मध्ये तोडले पाणी; तब्बल ९.३४७ टीएमसी पाणी बारामती भागाला मिळणार

मुंबई |महाईन्यूज|प्रतिनिधी|

नीरा-देवधर धरणाचे बारामतीला दिलेले अतिरिक्त पाणी दुष्काळी भागाकडे वळवून फडणवीस सरकारने मोठा दिलासा दिला होता. मात्र महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने सोलापूर-सातारा या दुष्काळी भागाचे पाणी पवार काका-पुतण्याचे होम टाऊन असलेल्या बारामतीच्या पुन्हा घशात घातले आहे. त्या संदर्भातल्या प्रस्तावाला बुधवारी मंत्रीमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे.

पुणे जिल्ह्यातील नीरा-देवधर धरणातील डाव्या कालव्यातून ६० टक्के पाणी बारामती, इंदापूर व पुरंदर तालुक्याला दिले जात होते. तर उजव्या कालव्यातून ४० टक्के पाणी माळशिरस, फलटण, पंढरपूर, सांगोला या सोलापूर व सातारा जिल्ह्यातील दुष्काळी भागाला देण्यात येत होते.

अजित पवार जलसंपदा मंत्री असताना सन २००७ मध्ये तसा निर्णय घेण्यात आला होता. तब्बल दहा वर्षे सातारा व सोलापूरच्या दुष्काळी भागाचे पाणी बारामतीला मिळत होते. मात्र सन २०१९ च्या लोकसभा निवडणुकीनंतर राजकीय स्थिती बदलली. काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेले व माढाचे खासदार झालेले रणजितसिंह नाईक- निंबाळकर यांनी बारामतीला जाणारे पाणी तोडण्याची मागणी केली होती.

सह्याद्री अतिथीगृहावर बुधवारी मंत्रिमंडळ बैठक झाली. त्यामध्ये नीरा-देवधर धरणाचे ५५ टक्के पाणी डाव्या कालव्यातून बारामतीला तर उजव्या कालव्यातून सातारा-सोलापूर भागाला ४५ टक्के पाणी देण्याचा निर्णय घेतला गेला. आश्चर्य म्हणजे नव्या निर्णयात नीरा -देवधर धरणाबरोबरच पुणे जिल्ह्यातील गुंजवणी धरणाच्या (३.६९ टीएमसी क्षमता) पाण्याचे वाटप याच सूत्रानुसार करण्यात आले. परिणामी दोन्ही धरणाचे मिळून तब्बल ९.३४७ टीएमसी पाणी बारामती भागाला मिळणार आहे.

बारामतीचे जून २०१९ मध्ये तोडले पाणी

भाजप सरकारच्या काळात तत्कालीन जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी बारामतीला २००७ पासून मिळणारे पाणी बंद करण्याची निर्णय घेतला. डाव्या कालव्यातून बारामतीला जाणारे पाणी लाभ क्षेत्राचे बाहेर जाणारे आहे, असा युक्तिवाद फडणवीस सरकारने केला होता. जून २०१९ मध्ये फडणवीस सरकारने बारामतीचे पाणी तोडल्यानंतर दुष्काळी भागात पेढे वाटण्यात आले होते. तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी फडणवीस सरकार दुष्काळाचे राजकारण करत असल्याचा गंभीर आरोप केला होता.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button