breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

दुधाला 5 रूपये अनुदान द्या!अन्यथा

  • 16 जुलैपासून मुंबईला जाणा-या दुधाच्या गाड्या रोखणार

  • स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा इशारा

  • वारकऱ्यांना दूध मोफत वाटणार

मुंबई – शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे दूध व्यवसाय तोट्यात गेला आहे. आर्थिक संकटात सापडलेल्या दुध व्यवसायाला बाहेर काढण्यासाठी सरकारने काहीच केले नाही. त्यामुळे गायीच्या दुधाला 5 रुपये अनुदान द्या, अन्यथा 16 जुलैपासून मुंबईला दुधाचा एक थेंबही मिळणार नाही.

मुंबईला जाणा-या दुधाच्या गाड्या रोखण्यात येतील, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे. तसेच दुध भुकटी, पावडर आणि लोणी जीएसटीमधून वगळावा, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

मुंबईतील पत्रकार परिषदेत राजू शेट्टी यांनी हा इशारा दिला. गायीच्या दुधाला 5 रुपये अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले नाही तर 16 जुलैपासून मुंबईचा दूधपुरवठा तोडन्याचा इशारा त्यांनी दिला. गोवा आणि कर्नाटक सरकार जर दुधाला अनुदान देत असेल तर महाराष्ट्र सरकारला का शक्‍य होत नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. वेळ प्रसंगी दूध वारकऱ्यांना वाटू पण मुंबईत दूध कोणत्याही परिस्थितीत येऊ देणार नाही. त्यासाठी वाट्टेल ते करायची तयारी असल्याचेही शेट्टी यांनी सांगितले.

पुण्यात साखर आणि दूध प्रश्नी 29 जून रोजी मोर्चा काढून सरकारला इशारा दिला होता. मात्र सरकारने याकडे कानाडोळा केला. त्यामुळे दुध संकलन आणि दूध विक्री बंद आंदोलनामुळे जी परिस्थिती उद्भवेल त्यास सरकार जबाबदार असेल, पण यापुढे शेतकऱ्याची लूट होऊ देणार नाही, असा इशारा शेट्टी यांनी दिला.

सध्या दुधउत्पादक कमी झालेल्या दरामुळे आर्थिक संकटात सापडला आहे. दुधाचा उत्पादन खर्च 35 रुपये लिटरवर जाऊन पोहोचलाय. मात्र सध्या शेतकऱ्यांना 15 रुपये दर मिळतोय. याबाबत दुध संघाच्या प्रतिनिधीसह प्रत्यक्ष भेटून सरकारला याबाबतची समस्या मांडली होती. यावर सरकारने दुधाच्या भुकटी साठी 3 रुपये देण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी 53 कोटी रुपये खर्चही करण्यात आला आहे. मात्र या 53 कोटी रुपयांपैकी एक रुपयाही दूध उत्पादन करणा-यांना मिळाला नाही. सरकारने या प्रश्नाकडे गंभीरपणे लक्ष देण्याची गरज असतांना जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळेच दूध विक्री करायची नाही, असा निर्णय घेण्यात आला असल्याचे राजू शेट्टी यांनी स्पष्ट केले.

चंद्रकांत पाटील यांना बोलण्याचा अधिकार नाही! 
महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांना दूध प्रश्नावर काहीही बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. दूध उत्पादकांसाठी त्यांनी काय केले आहे ते आगोदर सांगावे आणि नंतर बोलावे असा दमही त्यांनी भरला.

परराज्यातील दुधालाही नो एण्ट्री… 
राज्यात सातारा, सांगली, कोल्हापूर, अहमदनगर भागातील दूध बंद झाल्यानंतर गुजरात आणि कर्नाटक या राज्यातून मुंबईत दूध आणण्याचा प्रयत्न केला जाईल. मात्र, गनिमीकावा करून कोणत्याच राज्यातून महाराष्ट्रात दुधाचा एकही थेंब येऊ दिला जाणार नाही. वेळ प्रसंगी कायदा हातात घेऊन वाट्टेल ते करण्याची आमची तयारी आहे. दुध संकलनासाठी जबरदस्ती करणार असाल तर गाठ स्वाभिमानिशी आहे, असा इशाराही त्यांनी दिला. यावेळी स्वाभिमानी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर, राज्य प्रवक्ते अनिल पवार यावेळी उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button