दीड महिन्यांनी पेट्रोलच्या दरात वाढ;डिझेलचे दर मात्र स्थिर
नवी दिल्ली – जवळपास ४७ दिवसानंतर आज पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर १२ ते १४ पैशांची वाढ झाली आहे. विशेष म्हणजे यावेळी डिझेलच्या दरात कोणतीही वाढ झालेली नाही. यापूर्वी २९ जून रोजी पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर ५ पैशांची वाढ झाली होती. त्यानंतरच्या काळात डिझेलच्या दरात १० वेळा वाढ झाली असली तरी पेट्रोलचे दर मात्र स्थिर होते.
गेल्या दीड महिन्यापासून पेट्रोलच्या दरात आणि १५ दिवसांपासून डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नव्हता. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला होता. मात्र आज डिझेलच्या दरात वाढ झाली नसली तरी पेट्रोल महागले आहे. मुंबईत पेट्रोलचा दर प्रतिलिटर १२ पैसे वाढल्यामुळे त्याचा दर ८७ रुपये ३१ पैसे लिटर आणि डिझेलचा दर ८० रुपये ११ पैसे लिटर इतके आहे. दिल्लीत पेट्रोल १४ पैसे लिटर एवढे महागले आहे. त्यामुळे दिल्लीतील पेट्रोलचा दर ८० रुपये ५७ पैसे लिटर झाला असून डिझेलचा दर ७३ रुपये ५६ पैसे आहे. कोलकाता, बंगळुरू आणि चेन्नई या महानगरांमध्येही पेट्रोल १२ पैशांनी महागले आहे.