breaking-newsमहाराष्ट्र

दिवाळी पहाटे फटाक्यांचा क्षीणस्वर

मुंबई – सर्वोच्च न्यायालयाने दिवाळीत फटाके वाजवण्यासाठी दिलेली दोन तासांची मुदत, लोकांमध्ये झालेली प्रदूषणाविषयी जागरूकता, शाळाशाळांमधून मुलांना फटाके न वाजवता हरित दिवाळी साजरी करण्याचे झालेले आवाहन, फटाक्याने होणाऱ्या ध्वनी-वायू प्रदूषणावर समाजमाध्यमांतून होणाऱ्या चर्चा आणि फटाक्यांच्या वाढत जाणाऱ्या किमती यामुळे यंदा पहिल्यांदाच देशभरातील दिवाळीच्या पहिल्या पहाटे फटाक्यांचा आवाज लोपलेला होता.

मुंबई, पुण्यासह राज्यातील सर्वच शहरांमध्ये फटाक्यांचा आवाज क्षीण झाल्याचे जाणवले. अभ्यंग स्नानानंतर उजाडेस्तोवर फटाके उडविण्याची नेहमीची हौस सर्वत्र ओसरल्याचे दिसत होते. एरवी कर्णकर्कश फटाक्यांनी दणाणणाऱ्या ठाणे शहरात फटाक्यांच्या आवाजाचा गेल्या सात वर्षांतला नीचांक जाणवला. मुंबई व पुण्यासह काही शहरांत सेल्फीला आणि  व्हॉट्सअ‍ॅपमार्फत चित्रफटाक्यांना लोकांनी पसंती दिली

मंगळवारी मुंबईतील अनेक भागांत फटाक्यांची मंगळवारी पहाटे आतषबाजी झाली नाही. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने सुमारे ३२ फटाक्यांची चाचणी केली होती. यात विहित मर्यादेपेक्षा अधिक आवाज करणाऱ्या फटाक्यांची नोंद करण्यात आली. शिवाय ध्वनी प्रदूषणावर नियंत्रण आणून त्याची नोंद करण्यासाठी प्रदूषण मंडळातर्फे  मुंबईत २५ केंद्रे उभारण्यात आली आहेत. गेल्या आठवडय़ापासून या केंद्रातील अधिकारी ध्वनी प्रदूषणाच्या पातळीची नोंद करत असल्याची माहिती मंडळाचे डॉ. विद्यानंद मोटघरे यांनी दिली. मंगळवारी मुंबईतील अनेक विभागांत फटाक्यांचा आवाज कमी होता. ध्वनी प्रदूषणाचे उल्लंघन केल्याबद्दल एकही गुन्हा शहरात नोंदवला गेला नाही. बुधवारी लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने ध्वनी प्रदूषणाचे नियम मोडून फटाक्यांची आतषबाजी होण्याची शक्यता आहे. या परिस्थितीवर लक्ष ठेवले जाणार आहे. ठाण्यातील कोपरी भागातील फटाक्यांचे घाऊक व्यापारी सतीश पिंगळे यांनीही यंदा फटाके कमी वाजल्याचे सांगितले. उपवन, हिरानंदानी, नौपाडा, राम मारुती रोड या भागात दरवर्षीपेक्षा कमी फटाके वाजल्याचे नागरिकांकडून सांगण्यात आले.

पुण्यात फटाक्यांवर पाणी!

ऐन दिवाळीत पडलेला पाऊस आणि बाजारातील मंदीमुळे यंदा पुण्यात फटाके उडविण्यात नागरिकांनी आखडता हात घेतला. गेले तीन दिवस पाऊस सुरू आहे. दोन वर्षांपासून बाजारात मंदीसदृश वातावरण आहे. याबरोबरच फटाके विक्रीवरही बंधने आल्याने फटाके विक्रीचे स्टॉल यंदा कमी आहेत.

ठाण्यात सात वर्षांनी शांतता

ठाण्यात गेल्या सात वर्षांत दिवाळी पहाटेच्या दिवशी आवाजाची पातळी ही ७० ते ९९ डेसिबल इतकी घातक असायची, मात्र यंदा ती पातळी  ५५ ते ७० डेसिबल इतकी कमी झाली, असे ठाण्यातील सामाजिक कार्यकर्ते डॉ. महेश बेडेकर यांनी सांगितले. नौपाडा, हिरानंदानी येथे मंगळवारी केलेल्या ध्वनिमापन सर्वेक्षणातून ही बाब समोर आली आहे.

देशभरात विक्रीत घट

* फटाक्यांचा खप देशपातळीवर घटला आहे. फटाक्यांची बाजारपेठ २० हजार कोटींची असून त्याला फटका बसला आहे.

* दिल्लीत फटाक्यांची विक्री ५० टक्क्यांनी कमी झाली आहे. पूर्वी लोक फटाक्यांवर पाच हजार रुपये खर्च करीत, ते प्रमाण आता एक हजार रुपये झाले आहे, त्यामुळे सर्वच राज्यांत फटाक्यांना फटका बसल्याचे दिसून आले.

* न्यायालयाने दिलेल्या निकालाचाही मोठा परिणाम लोकांवर झाला असून त्यांचे फटाक्यातील स्वारस्य संपले आहे, अशी प्रतिक्रिया बेंगळुरूतील काही दुकानदारांनी व्यक्त केली.

पहिला गुन्हा दिल्लीत : दिल्लीतील मयूरविहार येथे

अवेळी फटाके उडवल्यावरून  पहिला गुन्हा दाखल करण्यात आला. मुंबईतही येत्या तीन दिवसांत विहित मर्यादेपेक्षा जास्त आवाज करणारे फटाके  फोडणारी व्यक्ती आढळल्यास त्यासंबंधीची माहिती पोलिसांकडे दिली जाणार आहे.

न्यायालयाने दिलेल्या निकालाचाही मोठा परिणाम लोकांवर झाला असून त्यांचे फटाक्यातील स्वारस्य संपले आहे, अशी प्रतिक्रिया बेंगळुरूतील काही दुकानदारांनी व्यक्त केली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button