breaking-newsआंतरराष्टीय

दहशतवाद्यांना पाकिस्तानच्या धर्तीचा वापर करु देणार नाही – इम्रान खान

पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर जगभरातून पाकिस्तानावर दहशतवादी संघटना आणि दहशतवाद्यांवर कारवाई करण्यासाठी दबाव आहे. यादरम्यान पाकिस्तानने काही प्रमाणात कारवाई करण्यास सुरुवात केली असल्याचं दिसत आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी आपलं सरकार देशाबाहेरील दहशतवादी हल्ल्यात सहभागी असणाऱ्या कोणत्याही दहशतवादी संघटनेला पाकिस्तानच्या धर्तीचा वापर करु देणार नाही असं म्हटलं आहे. गतवर्षी ऑगस्ट महिन्यात पंतप्रधानपदी विराजमान झालेल्या इम्रान खान यांनी आधीच्या सरकारवर दहशतवाद आणि दहशतवादी संघटनांना खतपाणी आणि आश्रय दिल्याचा आरोप केला आहे.

आधीच्या कोणत्याही सरकारने दहशतवादी संघटना आणि दहशतवाद्यांवर कारवाई केली नाही असं इम्रान खान यांनी म्हटलं आहे. इम्रान खान यांनी एकाप्रकारे हे वक्तव्य करत पाकिस्तानात दहशतवादी संघटना सक्रीय आहेत अशी कबुलीच दिली आहे.

तहरीक-ए-इन्साफ पक्षाचं सरकार आल्यापासून आम्ही राष्ट्रीय योजना तयार करुन त्याकडे गांभीर्याने लक्ष देत आहोत असं इम्रान खान यांनी सांगितलं आहे. याअंतर्गत दहशतवादाशी सामना करण्यावर लक्ष केंद्रीत केलं जात आहे. सिंध प्रांतात एका सभेत बोलताना इम्रान खान यांनी ही माहिती दिली.

पाकिस्तानने इस्लामिक दहशतवाद्यांविरूद्ध कारवाईची तीव्रता वाढवली आहे. पाकिस्तानी सरकारने १८२ मदरसे नियंत्रणात घेतले असल्याची घोषणा केली आहे. याबरोबरच पाकिस्तानने बंदी घातलेल्या संघटनांशी संबधित असलेल्या १०० दहशतवाद्यांना अटक केली आहे. ही कारवाई योग्य नियोजन करून करण्यात आल्याचे पाकिस्तानच्या मंत्रालयाकडून सांगण्यात आले.

पुलवामा येथे १४ फेब्रुवारी रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानवर जागतिक स्तरावरून दबाव वाढत आहे. त्यामुळे देशातील १८२ मदरश्यांवर नियंत्रण व व्यवस्थापन करण्यासाठी ही कारवाई करण्यात आल्याचे पाकिस्तानच्या गृह मंत्रालयाने सांगितले. तसेच १२१ समाजकंटकांना प्रतिबंधित कारवाई म्हणून तुरुगांत टाकण्यात आल्याचेही मंत्रालयाने सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button