थर्टी फर्स्टच्या रात्री महिलेवर सामूहिक बलात्कार
मुंबईच्या कुर्ला पोलिसांनी सामूहिक बलात्कार प्रकरणात दोन आरोपींना अटक केली असून अन्य एक आरोपी फरार आहे. ३१ डिसेंबरच्या रात्री पीडित महिलेवर बलात्कार करण्यात आला होता, त्यानंतर १ जानेवारी रोजी दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली. मुंबई मिररने याबाबतचं वृत्त दिलं आहे.
मुख्तार शेख (३९) आणि शाहिद आरिफ(४८) अशी अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत. पीडित विवाहीत महिला ३१ डिसेंबरच्या रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास घराबाहेरील सार्वजनिक शौचालयात जाण्यासाठी बाहेर पडली असता तीन जणांनी तिला अडवलं. पीडितेच्या तक्रारीनुसार, तिघांनी तिचे हात मागे पकडून ठेवले आणि तिच्या तोंडात एमडीएमए हे अंमलीपदार्थ कोंबण्यात आलं. त्यानंतर एका खोलीत नेऊन तिच्यावर बलात्कार करण्यात आला. सकाळी उठल्यावर थोडीफार शुद्धीत आली असता तिघांनी तिला याबाबत कोणासमोर वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली.
त्यानंतर पीडितेने हिंमत करुन त्याच दिवशी (१ जानेवारी) कुर्ला पोलीस स्थानक गाठलं आणि तक्रार केली. महिलेची वैद्यकीय चाचणी केल्यानंतर पोलिसांनी तीन आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला. त्यानंतर १ जानेवारी रोजीच दोघा आरोपींना पोलिसांनी अटक केली असून अद्याप तिसरा आरोपी फरार आहे, त्याचा शोध पोलीस घेत आहेत.