तुम्ही घरी बसा, अन्यथा कठोर पावलं उचलू : मुख्यमंत्री
मुंबई | “जनतेनं काही दिवस घराबाहेर पडू नये. घराबाहेरची काळजीदेखील घेऊ नये. घराबाहेरच्या लढाईसाठी सरकार सज्ज आहे. त्यामुळे घरातच बसा. अन्यथा सरकारला कठोर पावलं उचलावे लागतील”, असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला. उद्धव ठाकरे यांनी व्हिडीओ कॉन्फरंसिंगद्वारे जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक सूचना दिल्या.
“कोरोनाला पहिल्या पायरीवर थांबवलं तर तो पुढे वाढत नाही. गरोदर महिला, वृद्ध, मधुमेहबाधित आणि लहान मुलांची काळजी घ्या. कारण त्यांच्यामध्ये तीव्र लक्षण आढळून येत आहेत. कोरोनाच्या गुणाकाराचा काळ आता सुरु झाला आहे. या काळात आपल्याला कोरोनाची वजाबाकी करायची आहे”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
“जीवनाश्यक वस्तूंच्या दुकानात गर्दी केली तर कठोर पावलं उचलावे लागतील. सर्व यंत्रणा सूसज्ज आहे. जर या लढाईत पुढचे पाऊल टाकावे लागले तर त्यासाठी आपण सज्ज आहोत. तुम्ही घराबाहेरची काळजी करु नका नका. तुम्ही घरात राहा. सगळे मिळून आपलं काम करा, कुटुंबासोबत हसत खेळत राहा, कॅरम, चेस, गाण्याच्या भेंड्या खेळा”, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं.