breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

तुम्ही ईडी लावली तर मी सीडी लावेन!; एकनाथ खडसेंचा भाजपमधील ‘या’ नेत्याला इशारा

मुंबई – ‘तोंडावर गोड बोलायचे आणि मागून पाठीत खंजीर खुपसायचा असले उद्योग मी कधी केले नाहीत’, असा टोला हाणतानाच तुम्ही माझ्यामागे ईडी लावली तर मी तुमची सीडी लावेन, असा थेट इशाराच आज ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी दिला.

देवेंद्र फडणवीस यांच्या छळाला कंटाळून आपण भाजप सोडत असल्याचे एकनाथ खडसे यांनी आधीच जाहीर केले आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतानाही त्यांनी जे मनोगत मांडले त्यात टीकेचा रोख फडणवीस यांच्याकडेच होता. फडणवीस यांचे नाव न घेता भाजपमध्ये कशाप्रकारे छळ झाला याचा उल्लेख पुन्हा एकदा खडसेंनी केला. भाजपमध्ये माझ्याप्रमाणे घुसमट झालेले अनेक नेते आहेत. केवळ ईडीच्या भीतीने ते धाडस करत नाहीत, असा दावा करत खडसे यांनी भाजपच्या राज्यातील नेतृत्वाचा समाचार घेतला.

माझा गुन्हा काय ते सांगा, असे मी वारंवार म्हणत होतो. मात्र पक्षाने शेवटपर्यंत त्याचे उत्तर दिले नाही, अशी सल बोलून दाखवताना संघर्ष करणं हा माझा स्थायीभाव आहे आणि यापुढे संघर्ष करत राहणार असे खडसे म्हणाले. मी नेहमीच समोरासमोर लढलो. मात्र राजकारणात काम करत असताना कुणाबद्दल द्वेषभावना मनात ठेवली नाही. कधी कुणाच्या पाठीत खंजीर खुपसला नाही. तोंडावर गोड बोलायचे आणि मागून पाठीत खंजीर खुपसायचा हे मला कधी जमले नाही, असा टोला खडसे यांनी लगावला.

एका महिलेला माझ्याविरुद्ध उभे करून राजकारण केले गेले. अगदी खालच्या पातळीवर जाऊन राजकारण झाले. माझ्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला. खोटे आरोप झाले. अनेक चौकशा लावल्या. मला अडगळीत टाकले गेले. केवळ खंबीर होतो म्हणून मी यातून सावरलो, असे नमूद करत खडसे यांनी अप्रत्यक्षपणे फडणवीस यांना लक्ष्य केले. विधानसभेवेळी डावलले गेले त्यावरही खडसे यांनी भाष्य केले. रोहिणीला तेव्हा जबरदस्ती तिकीट दिले गेले. मी ते मागितले नव्हते, असा दावा खडसे यांनी केला. खडसे यांना पक्षात सगळं काही मिळालं असं आता भाजप नेते म्हणत आहेत. त्यावर भाष्य करताना नाथाभाऊने तुम्हाला उभी हयात दिली त्याचे काय?, त्या बदल्यात त्याला काय मिळाले?, असा सवाल खडसे यांनी केला.

राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचे मन बनवल्यानंतर जयंत पाटील यांना संपर्क साधला. त्यांच्याकडे इच्छा व्यक्त केली. तेव्हा नाथाभाऊ तुमच्यामागे तुमची माणसे ईडी लावतील, असे जयंत पाटील गमतीने म्हणाले. त्यावर त्यांनी ईडी लावली तर मी सीडी लावेन, असे म्हणालो असा उल्लेख खडसे यांनी केला आणि पवारांनाही हसू आवरले नाही. भाजप सरकारच्या काळात झालेले अनेक घोटाळे बाहेर काढण्याचे स्पष्ट संकेतही यावेळी खडसे यांनी दिले. आपल्यासोबत भाजपमधून येण्यासाठी अनेकजण इच्छूक आहेत. मात्र, पक्षांतर बंदीसह काही तांत्रिक अडचणी तूर्त असल्याचेही खडसे म्हणाले. करोनाचं संकट कमी झाल्यानंतर जळगावात जंगी कार्यक्रम होईल. तेव्हा तुम्हाला नाथाभाऊची ताकद दिसेल, असे सांगत त्यांनी भाजपला मोठे खिंडार पाडण्याचे संकेतच दिले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button