breaking-newsTOP NewsUncategorizedमुंबई

“तुमच्या कुंडल्या हाती येणार नाहीत याची काळजी घ्या!”; मुख्यमंत्र्यांना इशारा

हिवाळी अधिवेशनाच्या शेवटचा दिवस चांगलाच रंगला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर सडकून टीका केली. विरोधकांच्या आरोपांवर आणि प्रश्नांवर मुख्यमंत्र्यांनी उत्तरे दिली. यावेळी, विरोधकांसारखे विकृत राजकारण आम्ही करत नाही. मागच्या वर्षांत विरोधकांच्या कुंडल्या बघणारे आणि गेल्या वर्षभरात सरकार पाडण्याचा मुहूर्त पाहणारे आता पुस्तके आणि अहवाल वाचू लागले आहेत, असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना लगावला. मुख्यमंत्र्यांच्या या विधानाला भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे.

“महाभकास आघाडी आणि त्यांच्या कर्त्याधर्त्यांची चार दिन की चांदनी आटोपण्याच्या मार्गावर आहे. त्यांचे भविष्य आणि भवितव्य अंधारात आहे, हे सांगण्यासाठी कुंडली बघण्याचीही गरज नाही. असे अजानवाले हिरवे हिंदुत्व, दत्तात्रय गोत्र आणि ११० कोटींची वांगी किती काळ चालणार? तुमच्या कुंडल्या हाती येणार नाहीत याची काळजी घ्या. (कारण) त्यांचे वाचन सुरू झाले तर पोटात मुरडा येईल”, अशा शब्दात भातखळकर यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला.

मुख्यमंत्री ठाकरे काय म्हणाले…

“महाराष्ट्रात सरकारविरोधात काही बोलले तर तुरुंगात टाकले जाते. महाराष्ट्रात अघोषित आणीबाणी आहे, असा आरोप आमच्यावर झाला. मग ईडी आणि इतर तपास यंत्रणांचा वापर तुम्ही कसा करत आहात? तुमच्या आवडीचा जो असेल त्याच्या विरोधात हक्कभंग आणला की त्याच्या मागे ईडी लावणार का? प्रताप सरनाईकांच्या मागे ईडीचा ससेमिरा लावला. असे विकृत राजकारण

आम्ही करत नाही. या राजकारणाला महाराष्ट्रात थारा नाही. देशात आदर असलेल्या संस्थांना घरच्या नोकरांसारखे वापरले जात असेल आणि त्याचा वापर जर आमच्याविरोधात केला जात असेल, तर ते सहन करू शकत नाही. कोणीही उठावे आणि टपली मारून जावे हे आता होणार नाही. हे सरकार विनासंकट चालेल”, असा विश्वास मुख्यमंत्री ठाकरे यांनी व्यक्त केला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button