breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

तिन्ही बनावट फेसबुक खात्यांमागे एकच व्यक्ती?

हेरगिरी प्रकरण : समाजमाध्यमाद्वारे भुरळ घालण्याचा प्रयत्न

मुंबई : ब्रह्मोस एरोस्पेसचा अभियंता निशांत अग्रवाल आणि सीमा सुरक्षा दलाचा जवान अच्युतानंद मिश्रा यांना भुलवून भारतीय लष्कराची संवेदनशील, गोपनीय माहिती मिळवण्यासाठी तरुणींच्या नावे असलेल्या तीन वेगवेगळ्या फेसबुक खात्यांचा वापर केला गेला, अशी माहिती तपासातून पुढे आली आहे. ही बनावट खाती अग्रवाल, मिश्रा यांना भुलवण्याच्या इराद्यानेच तयार केली असावीत, या तिन्ही खात्यांआडून एकच व्यक्ती अग्रवाल आणि मिश्रासोबत गेल्या दोन वर्षांपासून संवाद साधत असावी, असा संशय आहे.

सीमा सुरक्षा दलातील जवान मिश्रा याला महिन्याभरापूर्वी उत्तर प्रदेश दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) दिल्लीतून अटक केली. चौकशीदरम्यान लष्कर, सीमा सुरक्षा दलाशी संबंधित बरीच संवेदनशील, गोपनीय माहिती मिश्राने परदेशी विशेषत: पाकिस्तानच्या इंटर सव्‍‌र्हीस इंटेलिजन्स(आयएसआय) या गुप्तहेर संघटनेला पुरवल्याचा संशय निर्माण झाला. मिश्राने ही माहिती फेसबुकवर ओळख झालेल्या परदेशी तरुणीला पुरवली. उत्तर प्रदेश एटीएसने मिश्राच्या फेसबुक खात्याचा अभ्यास सुरू केला. त्यातून अन्य दोन खात्यांबाबत संशय बळावला. ही खातीही परदेशी तरुणींची होती. ही खाती सेजल शर्मा, जसप्रीत कौर आणि खन्ना या नावाने सुरू होती. अग्रवाल अन्य दोन तरुणींच्या संपर्कात होता, ही माहिती मिश्राच्या फेसबुक खात्यावरून उत्तर प्रदेश एटीएसला मिळाली.

ही बाब एटीएसने महाराष्ट्र एटीएसला कळविली. महाराष्ट्र एटीएसने  एक आठवडा अग्रवालवर पाळत ठेवली. त्याची संपूर्ण माहिती मिळवून उत्तर प्रदेश एटीएसला दिली. त्यानंतर या दोन्ही पथकांनी संयुक्त कारवाईत अग्रवालला ताब्यात घेतले.

एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंतच्या तपासात अग्रवाल, मिश्रा संपर्कात असलेली तीन बनावट खाती पुढे आली आहेत. दोघे आणखी काही खात्यांवर माहिती पुरवत होते का? याचा तपास सुरू आहे. एका वरिष्ठ  अधिकाऱ्यानुसार ही तिन्ही खाती अग्रवाल, मिश्रा यांना भुलवून संवेदनशील, गोपनीय माहिती मिळवण्याच्या हेतूनेच तयार करण्यात आली. अत्यंत पद्धतशीरपणे या दोघांना ‘फ्रेण्ड रिक्वेस्ट’ पाठवण्यात आली. फेसबुकवर मित्र झाल्यानंतर  ओळख वाढवण्यात आली. या तिन्ही खात्यांद्वारे संवाद साधणारी व्यक्ती एकच असावी, असा संशय आहे.

एटीएसकडून एक पथक अग्रवालचे आर्थिक व्यवहार, दोन वर्षांत नागपूर-रूरकी व्यतिरिक्त देश-परदेशातील प्रवास, हाताखालील कर्मचाऱ्यांची चौकशी करणार आहे. अग्रवाल, मिश्रा यांना परदेशी गुप्तहेर संघटनेला संवेदनशील, गोपनीय माहिती पुरवतो आहोत, याची जाणीव होती का? त्यांनी आतापर्यंत कोणती माहिती या माध्यमातून पुरवली याचाही तपास सुरू आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button