breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

तासगावच्या 238 व्या रथोत्सवाला प्रारंभ

तासगांव –  राज्यातील गणेशभक्‍तांचे श्रद्धास्थान असलेल्या येथील उजव्या सोंडेच्या सिद्धिविनायकाच्या 238 व्या रथोत्सवासाठी तासगाव नगरी सज्ज झाली आहे. दुपारी येथील प्रसिध्द गणेश मंदिरापासून रथोत्सवाला हजारो भाविकांच्या उपस्थितीत प्रारंभ झाला. श्रीमंत राजेंद्र पटवर्धन यांच्यासह प्रमुख मानकऱ्यांच्या उपस्थितीत श्री पुजन झाले.

संपुर्ण मिरवणूक मार्ग भाविकमय झाला असून सुमारे लाखांवर भाविक सुमारे अर्धा किलोमीटरच्या अंतरावर श्री दर्शनासाठी उभे आहेत. प्रारंभावेळी खासदार संजय पाटील, आमदार सुमन पाटील, शुभूराजे देसाई यांच्यासह मान्यवर मंडळी हजर होती.

महाराष्ट्रात प्रसिद्ध उजव्या सोंडेच्या म्हणजे श्री सिद्धिविनायक गणपतींपैकी तासगावचा गणपती. मराठा साम्राज्याचे शेवटचे सेनापती परशुरामभाऊ पटवर्धन यांनी गणपतीपुळे येथील गणेशाचे दुसरे स्थान म्हणून उजव्या सोंडेच्या सिद्धिविनायकाची स्थापना केली.

आख्यायिका अशी, आहे, की परशुरामभाऊ हे गणपतीपुळे येथील देवस्थानचे भक्‍त होते. दर मोहिमेवर जाताना गणेश दर्शन घेऊन ते निघत. तासगाव येथे स्थायिक झाल्यानंतर भाऊंना दृष्टांत झाल्याने येथेच “श्रीं’ ची प्रतिष्ठापना करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. त्याप्रमाणे मंदिर बांधकाम सुरू केले. युद्ध मोहिमांमुळे दाक्षिणात्य मंदिरांची स्थापत्यकला त्यांच्या नजरेत भरली होती. पुण्याच्या पर्वतीवरील देवदेवेश्‍वर मंदिराचे शंकर पंचायतन त्यांना नेहमी आकृष्ट करीत असे. त्या पद्धतीचे मंदिराचे बांधकाम तासगावात करण्यात आले.

कर्नाटक, राजस्थानमधील गवंडी, चित्रकारांच्या परिश्रमातून बांधकामासाठी श्री सिद्धिविनायक मंदिर सन 1779 मध्ये पूर्ण झाले. त्याचवर्षी फाल्गुन शु.2 शके 1701 दिवशी “श्रीं’ ची प्रतिष्ठापना झाली. दाक्षिणात्य पद्धतीचे 96 फूट उंचीचे चुना, विटांत बांधलेले गोपुर स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना आहे. अशा पद्धतीचे गोपुर महाराष्ट्रात कोठेही आढळत नाही.

परशुरामभाऊंनी भक्‍तांचे या मंदिराशी नाते भावनिक व धार्मिक स्तरावर न राहता त्याला मानवी क्रियाशीलतेचे अधिष्ठान मिळावे म्हणून श्री आणि भक्‍तांतील अंतर राहू नये म्हणून भारतात दक्षिणेत रूढ रथयात्रेची संकल्पना आणली. तीस फूट उंचीचा तीन मजली लाकडी रथ प्रतिवर्षी ऋषी पंचमी दिवशी हजारो भाविक हाताने ओढतात. ही प्रथा दोन अपवाद वगळता अव्याहत सुरू आहे.

या रथामध्ये “श्रीं’ हे वडील श्रीकाशिविश्‍वेश्‍वर यांच्या भेटीसाठी ते जातात. तेथून ते परत येतात. दुसऱ्या मजल्यावर “श्रीं’ ची मूर्ती ठेवलेली असते. रात्री पटवर्धन राजवाड्यातील गणपतीचे विसर्जन होऊन उत्सव संपतो.

सार्वजनिक गणेशोत्सवापूर्वी 106 वर्षे 
आजचा रथोत्सव 238 वा रथोत्सव आहे. लोकमान्य टिळकांनी सन 1885 मध्ये सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला. त्यापूर्वी 106 वर्षे आधीच सर्वार्थाने सार्वजनिक असलेला असा तासगावचा रथोत्सव, लोकोत्सव महाराष्ट्रात एकमेव असा आहे. ही परंपरा इथल्या संस्थानिकांसह स्थानिक नागरिकांनी श्रध्दापूर्वक जपली आहे. सुमारे पाचशेंवर लोक एकावेळी रथ ढकलत असतात.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button